संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेसह गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार परिमंडळ सातच्या हद्दीत विविध पोलिस ठाण्यातंर्गत तब्बल २२ सराईतांना एकाचवेळी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी तडीपारीचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपुर्वी परिमंडळ दोनमधील १२ जणांना तडीपार केले होते. पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली आहे. तडीपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. यानुसार, परिमंडळ सात अंतर्गत विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल २२ सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५५, ५६ आणि ५७ अन्वये तडीपारी केली आहे.
विमानतळ, चंदननगर, वाघोली, लोणीकंद आणि लोहगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संबंधित गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यात जीवघेणा हल्ला, गुन्ह्याचा कट रचणे, बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणे, व्हिडिओ प्रसारित करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे, धमकी देणे, जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.
तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे
गुलाम उर्फ गुड्डू नवरुलहक मुस्तफा खान, शुभम सुखदेव सोनवणे, दीपक तुकाराम गायकवाड, अतुल गौतम ढोकरे, अनिल साहेबराव वीर, मुकेश बजरंग बुरुंगे, सागर गौतम अवधूत, आरती संजय साठे उर्फ जमदाडे, रिना पवन राजपूत, सागर राजू उर्फ राजेंद्र भालसिंग, सचिन किसन शिंदे, हर्षद कुमार शिंदे, रोशन कुमार साहू, अंजिक्य दादासाहेब मस्कुटे, संतोष गोविंद जाधव, प्रकाश बाबुराव शिवभक्ते, दत्तात्रय रंगनाथ गायकवाड, सुमित सुशील बोरगे, गणेश जालिंदर गलांडे, महेश देवराम लोंढे, अतिश उमेश डिंगरे, सुमित उर्फ बंटी रणजित गायकवाड यांना तडीपार करण्यात आले आहे.
परिमंडळ सात मधील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. -अबिनाश कुमार, पोलिस उपायुक्त, परिमंडळ सात
हडपसरमधून दोघांना तडीपार
हडपसरमधील दोन सराइतांना परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी तडीपार केले आहे. मुसा अबू शेख (वय २५, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर), अशोक महादेव राऊत (वय २८, रा. सुरक्षानगर, हिंगणे मळा, हडपसर) अशी तडीपार केलेल्या सराइतांची नावे आहेत. शेख याच्यावर मारामारीचे चार गुन्हे दाखल आहेत. राऊत याच्याविरुद्ध गावठी दारू विक्री प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.
गेल्या तीन महिन्यात वानवडी पोलिसांनी १४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) तीन गुंडांवर कारवाई करण्यात आली. तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुंड टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर सराइतांना तडीपार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






