फोटो सौजन्य - AI Gemini
मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची काही दिवसांपूर्वी Tinder ॲपवरून दोन अनोळखी तरुणांशी ओळख झाली होती. काही काळ दोन्ही बाजूंनी चॅटिंग सुरू होते. या काळात आरोपींनी तरुणींचा विश्वास संपादन केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर दोन्ही बहिणींना भेटण्यासाठी नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात बोलावण्यात आले. त्यांना येण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून आरोपींनी ऑनलाइन टॅक्सी बुक केल्याचेही समोर आले आहे. टॅक्सीने सीवूड्स येथे पोहोचल्यानंतर आरोपींनी दोन्ही बहिणींना मॉल तसेच परिसरातील अन्य ठिकाणी फिरवले.
हेही वाचा:Slapur Crime: आजोबांनी सांगितलं अन् चोरीचं गूढ उकललं; मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने जे केलं…
फिरत असताना आरोपींनी दोन्ही बहिणींना एका ठिकाणी नेले. तेथे त्यांना बळजबरीने बिअर पाजल्याचा आरोप आहे. दोन्ही बहिणी नशेत असल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी त्यांना ‘थोडा वेळ विश्रांती घेऊ’ असे सांगून सीवूड्समधील एका हॉटेलमध्ये नेले. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलच्या खोलीत दोन्ही बहिणींवर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर दोन्ही बहिणी घरी परतल्या. त्यांनी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी मुंबईत प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही पीडितांची वैद्यकीय तपासणी केली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी मॉल आणि हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच आरोपींनी बुक केलेल्या ऑनलाइन टॅक्सीच्या तपशीलावरूनही त्यांचा माग काढला जात आहे. पीडितांपैकी एक मुलगी अल्पवयीन असताना तिला हॉटेलमध्ये प्रवेश कसा देण्यात आला, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने नियमांचे पालन केले होते का, याचाही तपासाचा भाग असणार आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.






