सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ : कान्हे (ता. मावळ) येथील मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत हॉटेल परिसरात विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी एका ५५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १०५ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ, अंदाजे २ हजार १०० रुपये किमतीचा, जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहमोहम्मद अमुरद्दीन शेख कुरेशी (वय ५५, रा. कान्हे गावठाण, ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कान्हे गावच्या हद्दीत मुंबई ते पुणे जाणाऱ्या जुन्या महामार्गावर हॉटेल आस्वादच्या शेजारील हॉटेल पवार बिर्याणी परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळी संशयित व्यक्तीच्या ताब्यात अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ४८ ग्रॅम वजनाचा, ९६० रुपये किमतीचा गांजा सदृश्य अमली पदार्थ, तर दुसऱ्या पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ५७ ग्रॅम वजनाचा, १ हजार १४० रुपये किमतीचा गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. दोन्ही पिशव्यांमधील पदार्थाचे एकूण वजन १०५ ग्रॅम असून त्याची एकूण किंमत २ हजार १०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार संपत चहादु वायळ (ब.नं. १५८१) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५९/२०२६ नुसार गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क) व २०(ब)२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची वेळ १८ ऑगस्ट रोजी रात्री ११.०९ वाजता असून स्टे.डा. नोंद क्रमांक ५५/२०२६ आहे.
गुन्ह्याचा प्रथमवर्दी अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव मावळ यांच्या न्यायालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ करीत आहेत. तपासकामी पोलीस हवालदार मुंढे (ब.नं. २४२६) यांचे सहकार्य आहे. या कारवाईमुळे कान्हे परिसरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले असून, जप्त केलेला पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.






