
दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास भिंगारदिवे, अमोल भोसले, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशिकांत दरेकर, कैलास डुकरे यांनी ही कामगिरी केली आहे.
टिळक रस्ता परिसरातील चिमणबाग परिसरातून २३ जून रोजी एकाची दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा विश्रामबाग पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात दुचाकी चोरणारे चोरटे नारायण पेठेत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून एकाला पकडले. अंधारात त्याच्या बरोबर असलेला साथीदार पसार झाला. चौकशीत ताब्यात घेण्यात आलेला चोरटा अल्पवयीन असल्याची महिती मिळाली. तो कोथरूडमधील सुतारदरा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या आत्यासमक्ष चैाकशी केली. तेव्हा वैभव सांगुळे आणि कृष्णा शेळके यांच्याबरोबर पुणे शहरातून दुचाकी चोरल्याची कबुली अल्पवयीनाने दिली. त्यानंतर पोलिसांनी सांगुळे आणि शेळके यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
सांगुळे पसार झाला होता. त्याच्याबरोबर असलेला साथीदार शेळके हा लातूर परिसरात राहत असल्याचे समजले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांचे पथक लातूरला रवाना झाले. शेळके याला ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन आणि साथीदार शेळके यांच्याकडून दहा लाख रुपयांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या. शेळके, सांगुळे आणि अल्पवयीनाने पुणे शहर आणि जिल्ह्यातून आणखी काही दुचाकी चोरल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.