सराईत गुंडाच्या एन्काऊंटरप्रकरणी मोठी अपडेट; पत्नीने पलिसांना धक्काबुक्की केली अन्...
पुणे : कुख्यात गुंड टिप्पू पठाणच्या टोळीचा सदस्य, तसेच मोक्का गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याने पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर पिस्तूल रोखण्यापुर्वी पत्नी नसिफा हिने पोलिसांना धक्काबुक्की करत पतीला वाचविण्याचा तसेच त्या ठिकाणी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शाहरूख याने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रथम त्याच्या पायावर आणि नंतर त्याच्यावर गोळी झाडली. ज्यात त्याचा मृत्यू झाला. शाहरुखला नेमक्या किती गोळ्या लागल्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एप्रिल महिन्यात टिप्पू पठाण व त्याच्या टोळीवर खंडणी प्रकरणात गुन्हा नोंदवला होता. तेव्हापासून शाहरूख फरार होता.
मोहोळ पोलिसांत गुन्हा
शाहरूख व पत्नी नफिसावर मोहोळ पोलिसांत खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. शाहरूखने पिस्तूलातून पोलिसांवर गोळ्या झाडल्याप्रकरणी तसेच पत्नी नफिसाने पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
अनेक गंभीर गुन्हे; मोक्कातील आरोपी
शाहरूखवर वानवडी, हडपसर, काळेपडळ, कोंढवा पोलिसांत खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, आर्म अॅक्टप्रमाणे १५ गुन्हे आहेत. त्याच्यावर यापुर्वीही मोक्कानुसार, वानवडी पोलिसांनी कारवाई केली होती. या गुन्ह्यात तो जामीनावर होता. नंतर एप्रिल महिन्यात टिप्पू पठाण व त्याच्या टोळीतील १७ जणांवर मोक्कानुसार कारवाई केली. त्यात शाहरूख हा पसार होता.
लहान मुलांना पुढे करून ढाल..!
शाहरूख छोट्या खोलीत पत्नी व दोन ते तीन लहान मुलांसोबत राहत होता. सुरुवातीला त्यांनी मुलांना ढाल बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी अशाही स्थितीही मुलांचे संरक्षण करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
शाहरूखच्या कुटूंबियांचे आरोप
एन्काऊंटर झालेल्या शाहरूखच्या पत्नी नफिसा आणि वडिल रहीम यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. शाहरूख ३ महिन्यांपासून फरार होता. पण, बांबूने मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली. तो आत्याच्या इथे दहा दिवसांपूर्वी आला होता. यापूर्वीही त्याला चेहरापट्टीसाठी न आल्याने गाडी चोरीची असल्याचे म्हणत पोलिस ठाण्यात नेत मारहाण केली. पोलीस त्याला तीन महिन्यांपासून पळवत होते. जबरदस्तीने मोक्का लावला. त्याला चार गोळ्या घातल्या. मलाही पोलिसांनी केसाला धरून फेकले. सर्व पोलिसांना मी ओळखते. शाहरूखकडे पिस्तूल होती, पण त्याने गोळी झाडली नाही असा आरोप शाहरूखच्या पत्नीने केला आहे.