तू आम्हाला घाबरत नाहीस का? थांब, तुझा मर्डर करतो; पुण्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढत चालली असून, गुन्हेगारांच्या टोळ्या दररोज राज्यातील वेगवेगळ्या भागात धुडगूस घालून दहशत निर्माण करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रोड) हिंगणे खुर्द येथील खोराडवस्तीत गुरुवारी मध्यरात्री एका टोळक्याने रस्त्यावर राडा घालत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. लोखंडी रॉड आणि कोयते घेऊन टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.
या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रामकिसन गोरोबा टापरे (वय ४९, रा. खोराड वस्ती) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून मोहन गोरे आणि त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास तक्रारदार गोरोबा टापरे रस्त्यावर असताना मोहन गोरे आणि त्याचे पाच ते सहा साथीदार यांनी अचानक हल्ला केला. “आम्हीच या भागातील भाई आहोत” असा आरडा ओरडा करत त्यांनी रॉड व कोयते हवेत फिरवून गाड्यांची तोडफोड केली. या दरम्यान आरोपी मोहन गोरे याने तक्रारदाराला उद्देशून “तू आम्हाला घाबरत नाहीस का ? थांब, तुझा मर्डर करतो” अशी धमकी दिली. तसेच कोयत्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराने तो वार हुकवला असता, डोक्याच्या उजव्या बाजूस कानाजवळ घाव बसला. यात तक्रारदार जखमी झाला. घटनेनंतर आरोपी आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. सिंहगड रस्ता पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि दहशत निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेनंतर वस्तीमध्ये तणावाचे वातावरण आहे.
हे सुद्धा वाचा : चोरटे जोमात तर पोलिस कोमातच! सहा महिन्यात पुण्यातून 989 वाहने गेली चोरीला
सेनापती बापट रस्त्यावर टोळक्याचा तरुणावर हल्ला
सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकाजवळच भररस्त्यात गाडीला साईड देण्यावरून वाद घालत कारमधील तिघांनी एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेदम मारहाण करून त्याच्यावर शस्त्रानेही सपासप वार केले आहे. नंतर टोळके पसार झाले आहे. केवळ साईड देण्यावरून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने शहरात भितीदायक वातावरण असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. पृथ्वीराज कुमार नरवडे (वय १९, रा. भोसलेनगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश प्रमोद पवार (वय २९), रोहित अशोक धोत्रे (वय २४), आकाश विलास कुसाळकर (वय ३४, रा. वडारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून, याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.