पुण्यात चोरट्यांनी वाईन शॉपी फोडली; रोकडसह विदेशी दारूच्या बाटल्यांची चोरी
पुणे : राज्यात चोरीच्या घटना वाढल्या असून, पुण्यातील महंम्मदवाडी परिसरातील बंद वॉईन शॉपी फोडून चोरट्यांनी रोकडसह विदेशी दारूंच्या बाटल्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तत्पुर्वी गेल्या काही दिवसांपासून दारूच्या दुकानांमधील चोऱ्या वाढल्या असून, चोरटे रोकड आणि दारूच्या बाटल्यांची चोरी करत आहेत. एकीकडे मद्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली असताना आता मालकांना या चोरट्यांकडून देखील झळ बसू लागली आहे. तर भाव वाढीमुळे तर मद्यांची चोरी हात नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात हरप्रितसिंग होरा (वय ४०, रा. कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे महंम्मदवाडी येथील बीबीसी चौकात तक्रारदारांचे वॉईन शॉप आहे. नेहमी प्रमाणे ते शॉपी बंद करून गेल्यानंतर २ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शटरचे लॉक कटरने तोडून आत प्रवेश केला. तसेच, गल्यातील रोकड व विदेशी दारूंच्या बाटल्या असा एकूण ६९ हजार ७४० रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी रविवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, पुणे शहरात बंद फ्लॅट, दुकान यानंतर वॉईन शॉपी देखील चोरट्यांकडून फोडल्या जात असून, येथून रोकडसह विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या जात असल्याचे दिसत आहे. गेल्याच आठवड्यात मांजरी रोडवरील एका बार अँड रेस्टोरंटमध्ये चोरी झाली होती. तेथूनही दारूच्या बॉटलची चोरी झाली होती. एकीकडे मद्याचे भाव कडाडले असून, ही भाव वाढ झाल्याने तर मद्याची चोरी होत नाही ना, असा प्रश्न पडला आहे.
आनंदनगरला दोन फ्लॅट फोडले
सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरातील एकाच इमारतीमधील दोन बंद फ्लॅट फोडण्यात आले आहेत. चोरट्यांनी या दोन्ही फ्लॅटमधून ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. रविवारी दुपारीच हा प्रकार घडला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
कार विक्री-खरेदी दुकानातून दोन कारची चोरी
सोलापूर रस्त्यावरील मांजरी परिसरात असलेल्या जुन्या कार विक्री खरेदी दुकानाच्यासमोर लावलेल्या दोन कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांत राजेश सहानी (वय ४६) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदारांचे मांजरी रोडवर जुन्या कार खरेदी विक्रीचे मोठे दुकान आहे. रस्त्याच्या कडेला बाहेर या कार उभा केलेल्या असतात. दरम्यान, अज्ञाताने येथील दोन कार चोरून नेल्या आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.