आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये आलात तर...; पिंपरीत टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांत भिती पसरत आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीत दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणातून १९ जणांच्या टोळक्याने कोयते व लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. “आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये आलात तर जिवंत सोडणार नाही,” अशा थरकाप उडवणाऱ्या धमक्या देत आरोपी हवेत कोयते फिरवत घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटना कशी घडली?
वाल्मिकी चौक व भाजी मंडई पार्किंग परिसरात शनिवारी रात्री वार्षिक नवरात्री उत्सवात दांडिया सुरू होता. यावेळी १६ वर्षीय मुलगा दांडिया पाहण्यासाठी तेथे गेला होता. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. कोयता आणि लोखंडी गजाने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केले. जखमी मुलाने आरडाओरडा करताच नागरिक मदतीसाठी धावून आले. मात्र आरोपींनी कोयते हवेत फिरवत दहशत माजवली आणि धमक्या देत घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांत गुन्हा दाखल
जखमी मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या
बीड शहरात एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. यश देवेंद्र ढाका असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे. वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून धारदार शस्त्राने पोटात चाकू खुपसून यशची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली आहे. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. महिन्याभरापूर्वी यश आणि सुरज काटे या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले. त्यामुळे त्यांच्यात वैमानस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचे कारण समोर आले आहे.