सामाजिक कार्यकर्त्यावर लोखंडी सळईने हल्ला; कारणही आलं समोर
मंगळवेढा : उचेठाण (ता. मंगळवेढा) येथील भीमा नदी पात्रातून विना रॉयल्टी वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी केल्याच्या रागातून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रावसाहेब बेदरे (वय ४५) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यांना लोखंडी सळईने मारहाण करत ४ हजार रुपये रोख, रेडमी मोबाईल आणि ५.५ तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या लुटल्या गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नामदेव निकम, माऊली निकम (दोघे रा. कुरुल) यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता बेदरे हे त्यांच्या घरासमोर उभे असताना, नदी पात्रातून वाळू भरून जाणारे टीपर समोरून गेले. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क न झाल्याने तहसीलदार संतोष कणसे यांना माहिती दिली. कणसे यांनी महसूल कर्मचाऱ्यांना पाठवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बेदरे यांनी टीपरचे व्हिडिओ काढून गौण खनिज अधिकारी दिव्या वर्मा यांना व्हॉट्सअॅपवर पाठवले.
यावेळी उपसरपंच संगीता सोनवले यांनी भेटीसाठी बोलावल्याने, बेदरे व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर साखरे मोटरसायकलवरून सरपंचाच्या घरी जात असताना, सुमारे २० टीपर जुना सरकोली रस्ता ते उचेठाण ओढा दरम्यान उभे होते. त्यावेळी वरील दोघा आरोपींनी टीपरमधून उतरून बेदरे यांना अडवले व “तू का कलेक्टरकडे तक्रार केली?” असे म्हणत शिवीगाळ करून लोखंडी टॉमीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत बेदरे यांच्या पायांवर व पाठीमागे गंभीर दुखापत झाली.
दरम्यान त्यानंतर आरोपींनी त्यांच्या खिशातील ४,००० रुपये रोख, रेडमी मोबाईल फोन व साडे पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या हिसकावून नेल्या. बेदरे यांनी याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास बोराळे बीटचे पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करत आहेत.
ठेका लॉक करण्याची मागणी
दरम्यान, वाळू ठेका सुरु झाल्यापासून आतापर्यंत खंडणी, अॅट्रॉसिटी आणि मारहाणीचे तीन गुन्हे नोंद झाले आहेत. विना रॉयल्टी वाहतुकीवरून वाद वाढत असल्याने, भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने सदर ठेक्याचा तात्काळ पुनर्विचार करून तो लॉक करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.