
विरोधात प्रचार केल्याचा राग अनावर; भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
अनिल हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अनिकेत मोटे यांच्या प्रचारात सक्रिय होते. त्याचा राग मनात धरून भाजप उमेदवार विक्रम ताड यांच्या समर्थकांनी मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडले आहे. याबाबतची फिर्याद अनिल शिंदे यांनी जत पोलिसात दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) प्रमाणे सचिन श्रीमंत शिंदे (वय २६, रा. सैनिक नगर, शेगाव रोड) व प्रकाश माळी (वय २५, रा. कडीमळी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल शिंदे हे वेल्डिंगचे काम करत असताना संशयित प्रकाश माळी व सचिन शिंदे दोघे मोटरसायकलवरून तेथे आले. “विक्रम शिवाजी ताड यांचा प्रचार का केला नाहीस? त्यांच्या विरोधात का गेलास?” असे म्हणत त्यांनी अनिल शिंदे यांच्यावर हल्ला केला. दोघांनीही सुरुवातीला हाताने मारहाण केली. त्यानंतर प्रकाश माळी याने दगड हातात घेऊन अनिल शिंदे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस वार करून जखमी केले. सचिन शिंदे याने हातातील कड्याने डाव्या हाताच्या करंगळीवर मारून जखमी केले तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल खांडेकर करत आहेत.