
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 99 लाखांना घातला गंडा
पुणे : दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ९९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यंनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कसबा पेठेतील मेट्रो स्थानक परिसरात राहायला आहेत. ते सेवानिवृत्त आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ३ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. चोरट्यांनी बंदी घातलेल्या एका दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती त्यांना दाखविली. दहशतवादी कारवायांशी बँक खात्यातून पैसे पाठविण्यात आल्याची बतावणी करून या प्रकरणात अटक केली जाण्याची शक्यता आहे, अशी भीती दाखवून चोरट्यांनी तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले.
चोरट्यांनी भीती दाखविल्यानंतर ज्येष्ठ नागरिक घाबरले. त्यांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ९९ लाख रुपये जमा केले. आठवडाभरात त्यांनी जवळपास खात्यातील सर्व रक्कम चाेरट्यांच्या खात्यात जमा केली. त्यानंतरही चोरट्यांकडून पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सायबर चोरट्यांकडून तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. शनिवार पेठ, कोथरूड भागातील ज्येष्ठ नागरिकांची नुकतीच फसवणूक करण्यात आली. सक्तवसुली संचालनालय (ईडी), अमली पदार्थविरोधी पथक (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.