आयटी इंजिनिअरची सव्वा कोटींची फसवणूक; शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने घातला गंडा
पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून सतत नागरिकांना आवाहन केले जात आहे मात्र घटना कमी होताना दिसत नाही. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी एका आयटी इंजिनिअरला तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले असून, त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे.
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कर्वेनगर भागात राहण्यास असून, सोशल मिडीयाद्वारे त्यांना चोरट्यांनी एक लिंक पाठविली होती. त्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. लिंक ओपन केल्यानंतर शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. सुरुवातीला परतावा दिला. परतावा मिळाल्याने अभियंत्याचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यानूसार त्यांच्याकडून १ कोटी ३८ लाख रुपये उकळले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
उच्चशिक्षित तरुणांचीही फसवणूक
अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये केवळ साधे नागरिकच नव्हे, तर उच्चशिक्षित व्यावसायिक, आयटी इंजिनियर आणि गुंतवणुकीत पारंगत व्यक्ती देखील सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. आकर्षक परतावा, विश्वासार्ह वेबसाइट्सचे भासवलेले क्लोन आणि बनावट गुंतवणूक प्लॅटफॉर्म या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे.
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक सहकारनगर भागात राहतात. दिल्लीतील ‘टेलीकॉम डिपार्टमेट ऑफ इंडिया’च्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे केली. काळ्या पैशांच्या व्यवहारात मोबाइलचा वापर झाल्याची भिती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखविली. याप्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून त्यांना तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठाने वेळोवेळी २३ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढीस लागले आहेत. आठवड्यातील ही दुसरी घटना समोर आली आहे.