घरफोड्यांसोबतच उघड्या दरवाजांमधूनही चोऱ्या; पुण्यातील 'या' भागातून लाखोंचा ऐवज चोरला
पुणे : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच चोरटे आता उघड्या दरावाजातून आत शिरत घरातून किंमती ऐवज चोरू लागले आहेत. चतु:शृंगी, वाघोली आणि कोंढव्यात प्रत्येकी एका ठिकाणी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप व मोबाइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील नागरिक झोपेत असताना, तसेच घरातील वृद्ध महिला एकटी असताना चोरट्यांनी ही कृत्ये केली आहेत.
पुणे शहरात घरफोडीचे प्रकार सतत घडत आहेत. मात्र, आता बंद घरांबरोबर उघड्या घरांतून चोरी करण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. पहिली घटना मॉडेल कॉलनीतील चित्रकुट सोसायटीत घडली असून, ८५ वर्षीय महिलेच्या घरात उघड्या दरवाजातून शिरून ३ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरात असताना, त्यांच्या कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या. त्यांनी एका ६० वर्षीय महिलेवर चोरीचा संशय घेतला असून, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
वाघोलीत उघड्या दरवाजातून लॅपटॉप चोरी
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाडेवस्ती येथील ऑक्सी व्हॅली फेज दोनमधील भगवंत कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमधून १ लाख ९५ हजार २२१ रुपये किंमतीचे चार लॅपटॉप चोरीस गेले. ही घटना १२ ऑगस्टला पहाटे दोनच्या सुमारास घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे करीत आहेत.
कोंढव्यात घरात झोपेत असताना मोबाइल चोरी
कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर येथे एका घरातून ५० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. ही घटना १३ ऑगस्टला पहाटे साडेतीन ते सकाळी साडेनऊ या वेळेत घडली. यावेळी तरुणी घरात झोपली होती. कोंढवा पोलिस ठाण्यात याबाबत २९ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे.
काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उंड्री येथे न्याती इथॉस सोसायटीत बंद फ्लॅट फोडून १९ हजार रुपयांचे घड्याळ व रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ११ ऑगस्टला पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास घडली.
साडेतीन वर्षात तब्बल 73 कोटींचा ऐवज लंपास
सुरक्षित म्हणवणाऱ्या पुण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत असून, पै-पै जमवणाऱ्या पुणेकरांच्या घरांवर चोरटे डल्ला मारत ‘करोडपती’ होत आहेत. पुणेकर कंगाल होत असताना पुणे पोलिस मात्र, या चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षातील केवळ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पाहिल्यानंतर हे वास्तव दिसत आहे. साडे तीन वर्षात पुण्यासारख्या शांत व सुरक्षित शहरातील २ हजार बंद घरे फोडत तब्बल ७३ कोटींचा ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यातील केवळ १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज परत मिळविण्यात यश आलेले आहे. त्यातून घरफोड्यांमागील भयावह वास्तव दिसत आहे.