पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला
पुणे : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरटे दररोज राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागात बंद घरांना टार्गेट करुन लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून चोरीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड रोड भागातील गणेशमळा परिसरात तसेच कोंढवा बिबवेवाडी रोडवरील सोसायटीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ११ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर पर्वती आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात २९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या गणेशमळा भागातील ओैंदुबर सोसायटीत राहतात. त्या कुटूंबियासह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, ८ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. नुकताच हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक किरण पवार करतात.
तसेच, बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील मोरयानगरी सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेचा फ्लॅट फोडत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तर, बेडरूममध्ये घुसत कपाटातील सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय सोमवारी (११ ऑगस्ट) सकाळी सदनिका बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस हवालदार मेमाणे तपास करत आहेत.
साडेतीन वर्षात तब्बल 73 कोटींचा ऐवज लंपास
सुरक्षित म्हणवणाऱ्या पुण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत असून, पै-पै जमवणाऱ्या पुणेकरांच्या घरांवर चोरटे डल्ला मारत ‘करोडपती’ होत आहेत. पुणेकर कंगाल होत असताना पुणे पोलिस मात्र, या चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षातील केवळ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पाहिल्यानंतर हे वास्तव दिसत आहे. साडे तीन वर्षात पुण्यासारख्या शांत व सुरक्षित शहरातील २ हजार बंद घरे फोडत तब्बल ७३ कोटींचा ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यातील केवळ १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज परत मिळविण्यात यश आलेले आहे. त्यातून घरफोड्यांमागील भयावह वास्तव दिसत आहे. शांत शहरासोबतच सुरक्षित शहर म्हणून पुण्याची ओळख. पण, गेल्या काही वर्षात गुन्हेगारांनी गालबोट लावले आहे. वाहन चोरी, सोनसाखळी, लुटमार आणि घरफोडी अशा सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे सर्व सामान्य पुणेकर हैराण आहेत. काही वेळांसाठीही घर बंद केल्यानंतर कायम तुमच्यावरच नजर ठेवल्याप्रमाणे ते घर फोडले जात आहे. रात्री आणि दिवसा देखील घरफोडीच्या घटना घडत असल्याने पुणेकरांनी घराला कुलूप लावायचे की नाही, असा प्रश्न पडला आहे.