
‘दवा बाजार’मध्ये चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ
पोलिस ठाण्याला लागून 100 मीटरपरिसरातील घटना
धाडसी चोरीमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ
चिंचवड: औषधांची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचवड स्टेशन परिसरातील ‘दवा बाजार’मध्ये शुक्रवारी 9 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. अज्ञात चोरट्यांनी एकापाठोपाठ पाच दुकानांची शटर उचकटून लाखोंची रोकड लंपास केली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या मध्ये पिंपरी पोलिस ठाण्याला लागुन 100 मीटर वर असलेल्या परिसरात अशा प्रकारची घटना घडल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ४:४५ ते ५:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन अज्ञात चोरटे स्पोर्ट्स बाईकवरून या परिसरात आले होते. त्यांनी दवा बाजारमधील पटेल एजन्सी, तसेच कस्तुरी हाईट्स इमारतीमधील आनंद मेडिको आणि साई केअर सर्जिकल या दुकानांची शटर तोडून दुकानाच्या गल्ल्यांमधील लाखोंची रोकड लंपास केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी परिसरातील अन्य दुकानाचेही शटर तोडण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. दोन संशयित तरुण स्पोर्ट्स बाईकवरून अतिशय वेगाने आले आणि त्यांनी नियोजित पद्धतीने ही चोरी केली. अवघ्या १५ ते २० मिनिटांत त्यांनी पाच ठिकाणे लक्ष्य केल्याने, त्यांनी या परिसराची आधी रेकी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Crime News: सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक; चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. “आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील,” असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद
व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे सावट
चिंचवडचा दवा बाजार हा औषधे आणि कॉस्मेटिक्ससाठी शहरातील प्रमुख केंद्र मानला जातो. येथे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. अशा मुख्य बाजारपेठेत शिरून चोरट्यांनी पोलिसांना दिलेले हे खुले आव्हान मानले जात आहे. या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून, रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.