
हॉटेलमध्ये वेटरकडून ग्राहकावर हल्ला, दांडक्याने मारहाण; नेमकं काय घडलं?
दोन वेटरनी ग्राहक आणि त्याच्या मुलावर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञात वेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ६ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास जांभूळ गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत सदानंद संजु चौधरी (वय ५०, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. गावठाण, कामशेत) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी चौधरी हे आपल्या मुलासह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर काऊंटरवर बिल भरण्याच्या वेळी वेटरशी किरकोळ वाद झाला. वाद चिघळताच वेटरपैकी एकाने लाकडी दांडका उचलून चौधरी यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर आणि पाठीवर जोरात वार केले. त्याचप्रमाणे दुसऱ्या वेटरने चौधरींच्या मुलगा अभिषेक याच्या तोंडावर मारहाण केली.
यावेळी दोन्ही वेटरनी शिवीगाळ करत दमदाटी केली आणि जाणीवपूर्वक दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर चौधरी यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात दोन वेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.