शेअर मार्केटच्या आमिषाने 150 हून अधिक नागरिकांची फसवणूक, कोट्यवधींचा घोटाळा उघड
पिंपरी : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्यात आहेत. वेगवेगळे आमिषे दाखवून चोरटे नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी पडू नये, असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून केले जात असले तरीही घटना कमी होताना दिसत नाही. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली १५० हून अधिक नागरिकांची तब्बल २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी गोपनीय तपास करून या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, पाच मुख्य आरोपींना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
या फसवणुकीचा उलगडा एका आयटी अभियंत्याच्या तक्रारीनंतर झाला. या अभियंत्याने आमिषाला बळी पडून सुमारे ९० लाख रुपये गुंतवले होते. बनावट ऑनलाइन ट्रेडिंग ॲपवर त्याच्या खात्यात ९ कोटींचा नफा दाखवण्यात आला. मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न करताच त्याला ‘टॅक्स’ आणि ‘शुल्क’ भरावे लागतील असे सांगून पुन्हा पैसे उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
अशी होती टोळीची कार्यपद्धती
पोलिसांचा तपास आणि कारवाई
तक्रारीच्या आधारावर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. डिजिटल पुराव्यांच्या आधारे या टोळीच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला आणि पाच आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही टोळी फक्त एका प्रकरणापुरती मर्यादित नसून, अशाच प्रकारे आणखी अनेक नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढील तपास आणि नागरिकांना आवाहन
सायबर पोलिसांकडून आरोपींच्या बँक खात्यांचे, डिजिटल व्यवहारांचे आणि संपर्कांचे सखोल विश्लेषण सुरू आहे. या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, याचा उलगडा लवकरच होणार आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीवर अवास्तव परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अनोळखी लिंक, ॲप किंवा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद बाबी त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणाव्यात.