पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर टोळक्याचा तरुणावर हल्ला; शस्त्राने सपासप वार करुन खूनाचा प्रयत्न
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकाजवळच भररस्त्यात गाडीला साईड देण्यावरून वाद घालत कारमधील तिघांनी एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेदम मारहाण करून त्याच्यावर शस्त्रानेही सपासप वार केले आहे. नंतर टोळके पसार झाले आहे. केवळ साईड देण्यावरून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने शहरात भितीदायक वातावरण असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.
पृथ्वीराज कुमार नरवडे (वय १९, रा. भोसलेनगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश प्रमोद पवार (वय २९), रोहित अशोक धोत्रे (वय २४), आकाश विलास कुसाळकर (वय ३४, रा. वडारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून, याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पृथ्वीराज आणि आरोपींची पुर्वीची ओळख नाही. शनिवारी दुपारी तो सेनापती बापट रस्त्याने त्याच्या कारमधून जात होता. तेव्हा, आरोपी पाठिमागून त्यांच्या क्रेटा कारमधून आले. साईड देण्यावरून आरोपींनी वाद घातला. वादानंतर तिघांनी त्याचा पाठलाग केला. तसेच, वेताळबाबा चौकात त्यांनी तरुणाला गाठले. पृथ्वीराज एका साईडला गाडी लावून थांबलेला होता. त्यांनी त्यांची कार त्याच्या कारपुढे लावली. तसेच, खाली उतरून पृथ्वीराज याला त्याच्या गाडीतून बाहेर काढले. त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. रस्त्यावर पाडून मारहाण सुरू असतानाच एकाने शस्त्राने त्याच्या पाठिमागून डोक्यावरती सपासप वार केले. तर तिसऱ्याने तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणत बेदम मारहाण केली. नंतर टोळके तेथून पसार झाले. भरदुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. अधिक तपास पोलिस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : दारु पार्टीनंतर मित्रानेच केला मित्राचा खून; झोपल्यानंतर डोक्यात पहार घातला अन्…
पुण्यात भावाने केला भावावर गोळीबार
पुण्यातील वाघोली भागातील केसनंद परिसरात चुलत भावावरच जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून, गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुशील संभाजी ढोरे (वय ४२ वर्षे,रा. ढोरेवस्ती, केसनंद,नगर रस्ता) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव, भिवराज सुरेश हरगुडे (तिघे रा. केसनंद, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.