संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांना यश मिळत असल्याचे दिसून येत नाही. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारु पार्टी झाल्यानंतर आई बहिणीवरुन शिव्या दिल्याच्या रागातून झोपलेल्या मित्राचा मित्रानेच डोक्यात लोखंडी पहार घालून खून केल्याची घटना घडली आहे. खून करुन आरोपीने बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. पण पोलिसांनी त्याचा बनाव काही तासातच उघडकीस आणून त्याला अटक केली आहे.
रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३, रा. साईगंगा सोसायटीसमोरील पत्र्याची शेड, हांडेवाडी रोड) असे खुन झालेल्याचे नाव आहे. तर किसन राजमंगल सहा (वय २०, रा. हांडेवाडी रोड, मुळ रा़ मोतीहारी, बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास सुतार, रत्नदिप गायकवाड, अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
किसनची रस्त्याच्या कडेला नर्सरी आहे. तेथे रविकुमार यादव याचा रस्त्याच्या कडेला ‘टेडी’वेअर विक्रीचा व्यवसाय आहे. तेथेच पत्र्याच्या शेडमध्ये तो रहात होता. किसनने पोलीस नियंत्रण कक्षाला शनिवारी पहाटे फोन करून ‘मित्र रविकुमार यादवला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी दुकानातून बेडसिट व गादी दिली नाही, म्हणून मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे’, असे सांगितले. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा रविकुमार यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्याला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापुर्वी त्याचा मृत्यू झाला होता. मग, पोलिसांनी किसनकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने पोलिस नियत्रंण कक्षाला सांगितलेली कहाणी पुन्हा पोलिसांना सांगितली. तर, मी कसाबसा तेथून पळून पोलिस चौकीला गेलो. काही वेळाने परत येऊन पाहिले तेव्हा रविकुमार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, अशी माहिती दिली.
दरम्यान, किसनच्या हाताला एक जखम होती. त्याला पोलिसांनी विचारले तेव्हा त्याने पळताना पडल्याचे सांगितले. तसेच रविकुमारच्या शेडचा पत्रा सुद्धा वाकल्याचे पोलिसांना दिसले. सीसीटीव्हीत चार लोकं गाडीवरून जाताना-येताना सुद्धा दिसत होते. त्यामुळे किसनवर सुरुवातीला पोलिसांना शंका आली नाही. परंतू त्याच्याकडे खूनाच्या अनुषंगाने माहिती घेताना, वारंवार त्याच्या बोलण्यात विसंगती दिसून येत होती. पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीवर लक्ष केंद्रीत केले. तेव्हा तो काही तरी लपवत असल्याचे लक्षात आले. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच रविकुमारचा खून केल्याची कबुली दिली.
अशी घडली घटना
किसन आणि रविकुमार हे दोघे बिहार राज्यातील राहणारे आहेत. त्यामुळे दोघे एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे आहेत. अनेकदा दोघे एकत्र दारु पित असत. शुक्रवारी रात्री दारु पित बसले असताना रविकुमार याने विनाकारण किसनला आई बहिणीवरुन शिवीगाळ करुन, मारहाण केली. यापुर्वी देखील त्याने अशीच शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्याचा किसनला राग होता. त्यामुळे पहाटे तो झोपला असताना त्याने रविकुमारच्या डोक्यात लोखंडी पहारेने वार करुन त्याचा खुन केला. पण, बनाव मात्र, चौघांनी खून केल्याचा रचला.
दारु पिल्यानंतर शिवीगाळ करत असल्याच्या कारणातून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन तासाच्या आत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ज्याने खूनाची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती, तोच खूनी असल्याचे पुढे आले आहे.
– मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक काळेपडळ