संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या घरावर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. कोथरूडच्या डावी भुसारी कॉलनीतील एका इमारतीत घरफोडीसाठी शिरलेल्या चोरट्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला. पण, या चोरट्यांनी रिकाम्या हाती माघार घेताना येथील सीसीटीव्ही कॅमेरासमोर हात उंचावून पिस्तुल व कटावणी दाखवत अप्रत्यक्षपणे पोलिसांनाच आव्हान दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
चोरट्यांच्या या आव्हानाची जोरदार चर्चा झाली. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसही कामाला लागले. घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर बिबवेवाडीतून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावेळी चोरट्यांकडे पिस्तुल सदृश्य लायटर असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोथरूड येथील परमहंसनगरच्या श्री सुवर्ण सोसायटीत घडली आहे.
चोरट्यांनी धाडसाने घरफोडी करताना दहशत माजवली. चोरट्यांनी रविवारी रात्री या सोसायटीत प्रवेश केला. एका फ्लॅटच्या बाहेरील दरवाजाचे कुलूप तोडले. मात्र, त्यांना आतील दरवाजाचे कुलूप तोडता आले नाही. त्यामुळे त्यांनी तेथून माघार घेतली. नंतर ते इमारतीतून उतरत असताना एका मजल्यावर सीसीटीव्ही असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी तोंडाला मास्क लावला आणि दुसऱ्या क्षणाला हातातील पिस्तुल सदृश्य वस्तू आणि कटावणी कॅमेऱ्याकडे पाहून दाखवली. त्यानंतर चोरटे तेथून निघून गेले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनेचा आढावा घेतला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने चोरट्यांची ओळख निष्पन्न झाली होती. त्यांच्याकडे पिस्तुल नसून, ते लायटरचा वापर करीत असल्याची माहिती समोर आली. या चोरट्यांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. कोथरुडच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिस चौकशी करत आहेत.