चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली; महिलेने आरडाओरडा केला, पण...
पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता खराडी परिसरातील न्याती मॉलसमोर दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री साडे आकराच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व तिची मैत्रीण दुचाकीवरुन गुरुवारी (२७ जून) रात्री साडेअकराच्या सुमारास खराडी परिसरातून निघाल्या होत्या. न्याती मॉलसमोर त्या आल्यानंतर दुचाकीवर पाठिमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. परंतु, चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक कोळपे अधिक तपास करत आहेत.
वडगावमध्ये भरदिवसा घरफोडी
वडगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दीपाली प्रसाद गुरव (वय ३४, रा. सद्गुरुकृपा बिल्डींग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिरातील दानपेटी फोडली
चंदननगरमधील मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी १६ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुखदेव विट्ठल साकोरे (वय ६३, रा. शिवशक्ती चौक, गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. वडगाव शेरीतील जुन्या मुंढवा रस्त्यावर संत श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. मंदिरातील दानपेटीचे कुलूप उचकटून १६ हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.