अंबिका कला केंद्र गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आमदाराच्या भावासह तिघांना 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी
बारामती : गेल्या वर्षभरात राज्यातील वेगवगळ्या भागातून गोळीबाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे पोलीसही कारवाई करण्यासाठी अॅक्शन मोडवर आले आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबारप्रकरणी गुरुवारी (दि २४) पहाटे पोलिसांनी संशयित आरोपी कैलास ऊर्फ बाळासाहेब हिरामण मांडेकर, गणपत बाजीराव जगताप, रघुनाथ शंकर आव्हाड या तिघांना पुण्यातून अटक केली आहे. यामध्ये भोर वेल्हाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा समावेश आहे. आरोपींना सोमवारी (दि २५) मोठ्या पोलिस बंदोबस्तात दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (दि २८) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी (दि २१) मध्यरात्री रेणुका रुईकर यांच्या पार्टीत गाणी सुरू होती, त्यावेळी बाळासाहेब मांडेकर याने नाचताना अचानक हवेत गोळीबार केला. यातील एक गोळी छताला लागली तर दुसरी गोळी भिंतीला लागलेली आहे. गोळीचे तुकडे पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेत एक नृत्यांगना जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी कोणीही जखमी नसल्याचा दावा केला आहे. याबाबत पोलिसांनी तीन दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (दि २२) या प्रकरणाबाबत सरकारसह पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर पोलिसांनी दोन दिवस तपास केल्यानंतर भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ कैलास ऊर्फ बाळासाहेब मांडेकर याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला होता.
माऊली कटके आणि अनंता कटके यांची बदनामी
दौंड येथील कला केंद्रावरील गोळीबार प्रकरणाशी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचा संबंध जोडून सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही विरोधकांनी सोशल मीडियावर आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचे नाव जोडून खोटी पोस्ट व्हायरल केली. प्रत्यक्षात या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसताना बदनामी झाल्याने अनंता कटके यांनी वाघोली पोलिस ठाण्यात रविकांत वर्षे, अनिल जगताप, विकास लवांडे आणि महादेव बालगुडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांनीही विविध पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल केल्या आहेत.