संग्रहित फोटो
महादेवाच्या दर्शनानंतर परतीचा प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील पारडी (बी) गावातील भाविक श्रावण मासानिमित्त किनवट तालुक्यातील कैलास टेकडी आणि सहस्रकुंड येथील महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्यानंतर हे भाविक जीपमधून आपल्या गावाकडे परतत होते. परतीच्या प्रवासादरम्यान दिपला नाईक तांड्याजवळ जीपचा भीषण अपघात झाला.
झाडावर जोरात आदळली जीप
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जीप अचानक रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडक एवढी भीषण होती की जीपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मदत केली.
अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, सहा गंभीर जखमी
या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले. जखमींना स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या अपघातामुळे पारडी (बी) गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त जीपचा पंचनामा करून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास केला जात आहे. रस्त्याची स्थिती, वाहनाचा वेग आणि इतर बाबींचाही तपास करण्यात येत आहे. श्रावण मासानिमित्त महादेवाचे दर्शन घेऊन आनंदाने परतणाऱ्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






