सौजन्य फोटो - सोशल मिडीया
बीड: अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या बीडच्या तरुणाचा तुळजापूरजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापूर महामार्गावर कंटेनर चालवत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत आप्पा गर्जे (२७, रा. हाटोला) यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रकांत गर्जे हे मालवाहतूक कंटेनर चालक म्हणून काम करत होते. मंगळवारी ते कंटेनर घेऊन सोलापूरच्या दिशेने निघाले होते. तुळजापूरजवळ महामार्गावर पुढील बाजूला एक वाहन अचानक थांबल्याने चंद्रकांत यांनी कंटेनर थांबवण्यासाठी ब्रेक लावला. मात्र कंटेनर नियंत्रणात येण्यापूर्वीच समोरील वाहनाला धडकला. या अपघातात चंद्रकांत गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर चंद्रकांत यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. उपचार सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी हाटोला या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रकांत यांचा विवाह अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर नव्या संसाराची सुरुवात करत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि नव्या संसाराची जबाबदारी सांभाळण्यासाठी ते कंटेनर चालक म्हणून काम करत होते. रोज काम करून कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र अचानक झालेल्या अपघाताने कुटुंबावर मोठे संकट कोसळले.
चंद्रकांत यांच्या मृत्यूची बातमी हाटोला गावात पोहोचताच नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली. काही महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रकांत यांच्या पश्चात पत्नी, वडील आणि बहीण असा परिवार आहे. तरुण मुलाला गमावल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे.






