फोटो सौजन्य - Social Media
सावन वैश्य, नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांना मेघालय पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये एका पुरुषासह एका महिलेचा समावेश आहे. मेघालय पोलिसांनी या दोघांविरुद्ध ट्रान्झिट वॉरंट घेतल्यावर ही कारवाई करण्यात आली. सध्या नवी मुंबई पोलीस विभागात बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणात तपास आणि अटकेची मोहिम राबवली जात आहे. या धडक कारवाईला घाबरून अनेक बांगलादेशी नागरिक नवी मुंबई सोडून पळून जात आहेत. काहीजण देशाच्या विविध भागांत लपण्याचा प्रयत्न करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, मेघालय राज्यातील पोलिसांनी देखील मोठी कारवाई करत तेथील 20 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. तपासादरम्यान या बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबईतील जबीर युनूस शेख आणि नुसरत हर्षद काझी यांनी विविध स्वरूपात मदत केल्याचे उघड झाले. या मदतीमध्ये त्यांना ओळखपत्र मिळवून देणे, बँक खाती उघडून देणे आणि आर्थिक व्यवहारात मदत करणे यांचा समावेश होता.
मेघालय पोलिसांनी ही माहिती नवी मुंबई पोलिसांना दिल्यानंतर संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. जबीर शेख व नुसरत काझी यांना नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर मेघालय पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट घेऊन त्यांना मेघालय येथे पुढील चौकशीसाठी नेण्यात आले आहे.
पोलिस तपासात असेही उघड झाले आहे की, या दोघांनी बांगलादेशी नागरिकांना भारतीय बँकांमध्ये खाती उघडण्यास मदत केली होती आणि त्याद्वारे आर्थिक व्यवहार केले गेले. यामुळे बेकायदेशीर आर्थिक उलाढाल व बोगस कागदपत्रांचा वापर याबाबतही चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या नेटवर्कवर मोठा धक्का बसला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशी कारवाई भविष्यातही सुरू राहणार असून, देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही बेकायदेशीर कृतीला माफ केले जाणार नाही.