
घरात घुसून अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार
पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना दोघांनी तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातील धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार जून महिन्यापासून सुरु होता.
जितेंद्र नंदलाल गौड (वय ३५) व अरूण उर्फ खेसर प्रेमचंद गौड (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर या अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर वारजेत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश गोरखपूर येथील आहेत. ते पुण्यात बिगारी कामगार म्हणून काम करतात. पीडित मुलगी परराज्यातील आहे. ते एकाच भागात राहण्यास आहेत. पीडित मुलीचे कुटुंबीय बाहेर कामानिमित्त गेल्यानंतर आरोपींनी घरात घुसून तिच्यावर अत्याचार केले.
हेदेखील वाचा : Mumbai Crime: भिवंडीत अमानुष कृत्य! 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या
जून महिन्यापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार तिच्या कुटुंबियाच्या लक्षात आला. नंतर तिच्या घरच्यांनी तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने आरोपींनी केलेल्या कृत्याची कहाणी कुटुंबियांना सांगितली. नंतर कुटुंबियांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
बापानेच केला जन्मदात्या मुलीवर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी संतापजनक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या पवित्र नात्याचा खून करत एका जन्मदात्या बापानेच आपल्या अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केला. या कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून, करवीर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.