साखरपुड्यासाठी गेलेल्या चुलता-पुतण्यावर काळाचा घाला; भीषण अपघातात मृत्यू
शिरवळ : शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी (ता. खंडाळा) येथे कंटेनरची दुचाकीला धडक बसून चुलत्या-पुतण्याचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकाचा साखरपुडा करुन परत येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. अमोल रघुनाथ चव्हाण (वय ४०) व धनंजय बबनराव चव्हाण (वय ५६, दोघे रा. भोळी, ता. खंडाळा) अशी मृत्यू झालेल्या चुलत्या-पुतण्याची नावे आहेत. हे दोघे शिरवळ येथे नातेवाईकाच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी गेले हाेते. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली असून, कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोळी (ता. खंडाळा) येथील अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण दोघे शनिवारी (दि. ३१) शिरवळमध्ये नातेवाईकाच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी दुचाकीवरुन (एमएच ११ सीएक्स ११६५) गेले होते. यावेळी साखरपुडा झाल्यानंतर अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण शिरवळहून भोळीकडे येत होते. सायंकाळी चारच्या दरम्यान भोळी गावच्या हद्दीत असणार्या एसटी बस थांब्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरची (केए ५१ एएच ६५८२) दुचाकीला जोरात धडक बसली. यात अमोल व धनंजय गंभीर जखमी झाले. अपघातानंतर शिरवळ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य दाखल झाले.
दोघांना जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत रोहन चव्हाण यांनी शिरवळ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून कंटेनर चालक गौरव विजय ढोरे (वय २२, रा. गडकुमली, ता. साकोली, जि. भंडारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील धनकवडीत गळफास लावून महिलेची आत्महत्या; कारण…