सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : गुन्हेगारीत ‘खुन्नस’ अन् ‘पण’ ही शेवटची सिमारेषा मानली जाते आणि त्यातूनच मोठ-मोठ्या गुन्ह्यांना पुर्णत्वास नेले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कधीकाळी गँगस्टर सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकरांचा चेला असलेल्या सोमनाथ गायकवाडने आता पुर्ण आंदेकर टोळी संपविण्याचा पण केला आहे. तशी कबूलीच त्याने पोलिसांना चौकशीत दिली आहे. त्यातूनच पहिला वार थेट वनराज आंदेकर यांच्यावर करण्यात आल्याचे समजते. एकूणच याप्रकरणातून हे टोळीयुद्ध पुढे कोणत्या थरापर्यंत जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाना पेठेत वनराज आंदेकरांचा गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून खून केला. याप्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सयाजी गायकवाड, बहिण संजीवनी कोमकर, जावई गणेश कोमकर याच्यासह गणेशचे भाऊ, अनिकेत दुधभाते अशा तब्बल १५ जणांना अटक केली आहे. तर, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
वनराज खून प्रकरणाचा मास्टरमाईंड सोमा गायकवाड असल्याचे समोर आले. नंतर सोमा, प्रकाश व अनिकेत अशा तिघांनी खूनात महत्वाची भूमिका बजावत कट रचल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान, या आरोपींकडे गुन्हे शाखेकडून आता सखोल चौकशी केली जात आहे. तेव्हा सोमा गायकवाड याने आंदेकर टोळीच संपवायची आहे. या टोळीचे नामोनिशान मिटवायचे आहे, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. तेव्हा पोलीस देखील आवक झाले आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यात आरोपींना कोणी मदत केली याबाबत तपास सुरू असून, त्या अनुषंगाने काहींची नावे समोर आली आहेत. त्यांना देखील अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
खूनासाठी सर्वांनी थोडे-थोडे पैसे कॉन्ट्रीब्युशन केले..!
वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपींनी गेल्या काही महिन्यांपासून कट रचला असल्याचे दिसत आहे. आरोपींनी वनराज यांच्या खूनासाठी मोठा शस्त्रसाठा जमा केला होता. त्यासाठी सर्वांनी थोडे-थोडे पैसे कॉन्ट्रीब्युशन केले असल्याचे समोर आले आहे. दीड लाख रुपये जमा केल्यानंतर त्यांनी शस्त्रसाठा विकत आणला. निखील आखाडेच्या खूनानंतर आरोपी रिप्लाय देण्याच्या प्रयत्नात होते. यापुर्वी दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण, तो फसला. मात्र, रविवारी केलेले प्लॅनिंग करेक्ट ठरले आणि वनराज यांचा गेम ओव्हर झाला.
आंबेगाव पठार विशेष मोहिम…
सोमा गायकवाड आणि टोळीतील सदस्यांचे रहिवाशी भाग असलेल्या आंबेगाव पठार भागात पोलिसांनी मध्यरात्री अचानक विशेष मोहिम राबवत आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली. त्यासोबतच इतर परिसरात विशेष मोहिम राबवत झडती घेतली गेली आहे.
पोलिसांकडून खबरदारी
नाना पेठेतील आंदेकर टोळी, सोमनाथ गायकवाड टोळी तसेच अनिकेत दुधभाते याच्या टोळीशी निगडीत असणाऱ्या सर्वांची पुणे पोलीस झाडाझडती घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहेत. पुन्हा काही घडू नये, यासाठी ही खबरदारी पोलीस घेत आहेत. पण, दोन्ही बाजूने शेवटचा ‘पण’ केला गेला असल्याने पोलीस हे किती दिवस रोखू शकतात, हे पाहवे लागणार आहे.