
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरचा धक्कादायक कारनामा? अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत मोठा खुलासा
बाहेरून चकाकणाऱ्या सिनेसृष्टीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारमध्ये ३५ वर्षीय महिला अभिनेत्रीचा विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर मृत्यू झाला. चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका म्युझिक डायरेक्टरने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले आणि त्याद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या माध्यमातून तिच्याकडून सुमारे एक कोटी रुपये उकळल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत नलिनी नामजोशी या विरार पश्चिम येथील जेपी नगर परिसरात आई आणि भावासोबत राहत होत्या. त्या सिनेसृष्टीत ज्युनियर आर्टिस्ट आणि सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. घटनेच्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला घराबाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ होऊनही त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, विरारमधील ओलांडा नाका परिसरात त्या आढळून आल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास नलिनी यांनी अर्नाळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बाकड्यावर विषारी पदार्थ सेवन केला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी म्युझिक डायरेक्टरने चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये मोठ्या संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून जानेवारी २०२६ पासून नलिनी यांच्याशी जवळीक साधली होती. त्यानंतर त्याने त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. या ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून आरोपीने विविध कारणांसाठी त्यांच्याकडून सुमारे एक कोटी रुपये घेतल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. नलिनी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही कथित ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक फसवणुकीचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित म्युझिक डायरेक्टर सध्या फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून तक्रार, सुसाईड नोट आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची न्यायालयीन पडताळणी होणे बाकी आहे. तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.
Ans: विरारमध्ये ३५ वर्षीय अभिनेत्रीचा विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर मृत्यू झाला. तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
Ans: चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून अश्लील फोटो-व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आणि सुमारे एक कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
Ans: मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कथित ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक फसवणुकीचा उल्लेख असल्याची माहिती आहे