सौजन्य फोटो - नवराष्ट्र टीम
सातारा: वाई परिसरात गावठी पिस्टलच्या जोरावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना वाई पोलिसांनी जेरबंद केले. शेंदुरजणे येथील कॅनॉलजवळ हातात पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर दुसऱ्या आरोपीचाही पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून दोन गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा १ लाख ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाई-सुरूर रस्त्यावरील शेंदुरजणे हद्दीतील कॅनॉलजवळ एक युवक हातात पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. पोलिसांनी दुपारी साडेबारा वाजल्यापासून कॅनॉल परिसरात सापळा लावला. तब्बल पाच तास दबा धरून बसल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संशयित सुदेश पाटणे पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी हे पिस्टल जप्त केले.
पोलिसांच्या चौकशीत पाटणे याने हे पिस्टल स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच अक्षय देसाई यानेही त्याच्याकडून पिस्टल घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अक्षयचा शोध सुरू केला. दरम्यान, रात्री उशिरा अक्षय देसाई परखंदी रोडवरील चौकात पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे आणखी एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
दोन्ही आरोपींना अटक करून वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पिस्टलचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, आरोपींना शस्त्रे कोठून मिळाली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे आणि त्यांच्या पथकाने केली.






