सौजन्य फोटो - सोशल मिडीया
पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज ६ सप्टेंबर रोजी दिल्लीतील लाजपत नगर येथील सेंट्रल मार्केटमध्ये बहिणीसोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेला होता. त्यानंतर त्याने गुरुग्राममध्ये मीटिंग असल्याचे बहिणीला सांगितले आणि रात्री १० वाजेपर्यंत घरी परतण्याचे सांगितले. मात्र, युवराज घरी परतला नाही. त्याचा मोबाईलही बंद असल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. पाच दिवसांनंतरही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
तपासादरम्यान युवराजच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात आला. त्यातून युवराजने त्याची पूर्वीची कार्यालयीन सहकारी अन्या वत्स हिच्याशी संपर्क साधल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी अन्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तपासाची दिशा तिच्याकडे वळली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान अन्या आणि संयम यांची चौकशी करण्यात आली. दोघांनी युवराजच्या हत्येत सहभाग असल्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज आणि आरोपींमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह काही तास क्रेटा कारमध्ये ठेवण्यात आला आणि नंतर गुरुग्राममधील सेक्टर ७० परिसरातील गटारात टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपी उत्तराखंडला पळून गेल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी उत्तराखंडमधून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रमाबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.






