crime (फोटो सौजन्य : social media)
बेळगाव/कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर येथील सिद्धेश्वर मठात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मठाचे प्रमुख अडवी सिद्धराम स्वामी हे रात्रीच्या वेळी एका महिलेसोबत त्यांच्या खोलीत असल्याचे निदर्शनास आल्यावर गावात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी ही माहिती मिळताच मोठ्या संख्येने मठाकडे धाव घेतली आणि स्वामीजींना जाब विचारला. संतप्त ग्रामस्थांनी मठातून स्वामींची हकालपट्टी केली. विशेष म्हणजे, ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याने व मोठा गोंधळ उडाल्याने पोलिसांनी देखील मठाच्या घटनास्थळी धाव घेतली होती.
धक्कादायक ! मोबाईल दिला नाही म्हणून एकास मारहाण; मारहाणीत जखमी होताच…
स्वामीजींनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी गावातील ही महिला आपल्या मुलीसह मठात आली होती. रात्री उशीर झाल्यामुळे दोघींनी मठातच मुक्काम केला, असा खुलासा त्यांनी दिला. मात्र, ग्रामस्थ या स्पष्टीकरणावर समाधानी न होता संतप्त झाले आणि त्यांनी स्वामींची तात्काळ मठातून हकालपट्टी केली. ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठया संख्येने धाव घेतल्यामुळे खोलीत असलेली महिला व तिची मुलगी घाबरल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी या महिलेचे व्हिडिओ काढले असून ती महिला आपल्या मुलीसमवेत याठिकाणी दिसून येते.
घटनेचा प्रसार होताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्या महिलेची आणि तिच्या मुलीची सुरक्षितता लक्षात घेता त्यांना पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात सांत्वन केंद्रात हलवले. दुसऱ्या दिवशी पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वामी आणि ग्रामस्थांमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत स्वामींना मठ सोडण्याचा आग्रह धरला. अखेर परिस्थितीच्या गांभीर्यामुळे स्वामींनी मठातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ही घटना सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून सोशल मीडियावरही ती जोरदार व्हायरल होत आहे.
जळगाव हादरलं! दारुड्या मुलाच्या त्रासाने जन्मदात्याने केली हत्या, मृतदेह रस्त्यावर टाकून बनाव…..