होळीच्या दिवशी पालघरमध्ये घडला धक्कादायक प्रकार, बंद सुटकेसमध्ये आढळले महिलेचे मुंडके (फोटो सौजन्य - X)
Palghar crime News In Marathi: महाराष्ट्रातील पालघर येथील विरार भागात एका सूटकेसमध्ये एका महिलेचे कापलेले मुंडके आढळल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्गाहजवळ काही मुलांना खेळताना एक सुटकेस आढळली. मुलांनी ती सुटकेस उघडली असता त्यात एका महिलेचे मुंडके आडळून आले. स्थानिक मुलांनी आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिसाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी पीरकुंडा दर्ग्याजवळ घडली. लोकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस आता हे कोणाचे मुंडके आहे आणि या हत्येमागे कोणाचा हात असू शकतो याचा तपास सुरू आहे.
या घटनेनंतर पालघरमधील स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पीरकुंडा दर्ग्याजवळील रहिवासी म्हणतात की हा परिसर सामान्यतः शांत असतो, परंतु अशा घटनेमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मांडवी पोलिस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आमची पथके या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पीडितेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. यासोबतच शरीराच्या इतर भागांचा शोध घेतला जात आहे. पोलिस स्थानिक लोक आणि व्यापाऱ्यांची चौकशी करत आहेत.मांडवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, फॉरेन्सिक तज्ञ पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी भेट देतील आणि हत्येचे गूढ उकलण्यासाठी तपास सुरू आहे.