खरेदीच्या बहाण्याने दुकानातून चोरी; महिलेने साडेचार लाखांचा ऐवज पळविला
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारजेतील दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलेने चार लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज असलेली पिशवी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने वारजे पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनुसार, एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वारजेतील सहयोगनगर येथे राहते. वारजेतील अष्टविनायक चौकात त्यांचे भाजीपाला, मसाले विक्री, तसेच बांगड्याचे दुकान आहे. सकाळी साडेसात ते रात्री साडेदहा पर्यंत त्यांचे दुकान सुरू असते. त्यांच्या मुलाचा विवाह ठरला आहे. घरी दिवसभर कोणी नसल्याने महिला दररोज मुलाच्या विवाहासाठी जमा केलेली २ लाखांची रोकड आणि दागिने पिशवीत घेऊन दुकानात यायची. मुलगा आईला दुकानात मदत करतो.
२२ मार्च रोजी महिला आणि मुलगा दुकानात नेहमीप्रमाणे आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुलगा मार्केट यार्डात मसाले खरेदीसाठी गेला. तेव्हा दुकानात गर्दी झाल्याने महिलेने शेजारी भाजी विक्री करणाऱ्या एका तरुणाला मदतीसाठी दुकानात बोलावले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक महिला दुकानात बांगड्या खरेदीसाठी आली. दुकानाबाहेर महिलेचा साथीदार दुचाकीवर थांबला होता. महिलेने बांगड्यांबाबत विचारणा केली. तेव्हा दुकानदार महिलेने तिला बांगड्या दाखविण्यास सुरुवात केली. तेव्हा दुकानदार महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधत दुकानातील एका जाळीवर ठेवलेली पिशवी घेऊन तिने पोबारा केला.