
यात्रेत गोंधळ घालण्याचा कट उधळला; यवत पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
पाटस : राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस, केडगाव, चौफुला परिसरात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना यवत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पाठलाग करुन घेतले ताब्यात
महेश मनोज दुर्बे (वय २२ रा. फराटे गल्ली दौंड ता. दौंड जि. पुणे), महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २६ रा. पाटस तामखडा ता. दौंड जि. पुणे), पृथ्वी अशोक खंडाळे (वय २३ रा. इरीगेशन कॉलनी दौंड ता. दौंड, जि. पुणे ) आणि पोलीसांना हवा असलेला आदिनाथ ईश्वर गिरमे या चार सराईत गुन्हेगारांना यवत पोलीसांनी बुधवारी (दि. ५ ) पावणे बारा वाजण्याच्या आसपास पळून जात असताना पाठलाग करुन ताब्यात घेतले.
पोलिसांना वाद होण्याची आधीच मिळाली माहिती
पाटसचे ग्रामदैवत नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने यवत पोलिसांनी पाटसमध्ये ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. चौफुला येथील रेणुका कला केंद्रात पाटस येथील दोन गटात झालेल्या वादानंतर एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आणि या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला सराईत आरोपी आदिनाथ ईश्वर गिरमे हा मारूती कंपनीच्या स्विप्ट कारमधून (क्र .एम एच/४२/एच/६२४१) पुणे- सोलापूर महामार्गावरुन पाटस आणि कुसेगाव बाजुकडे जाणार आहे, अशी खात्रीशीर माहिती यावेळी यवत पोलिसांना मिळाली होती.
बंदोबस्तासाठी असलेले देवकर यांना माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने यांनी क्षणांचा विलंब न करता डी.बी. पथकाच्या मदतीने पाटस परिसरात पुणे- सोलापूर रोडच्या सेवा रस्त्यावर लाईटच्या उजेडात नाकाबंदी लावली. त्या ठिकाणी थांबून पुणे बाजुकडून येणारे वाहने चेक करत असताना पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी आदिनाथ गिरमे हा पोलिसांच्या ताब्यात मिळून येत नव्हता, पोलिसांनी गाडी थांबविली असता, त्याच्या ताब्यातील चारचाकी कार त्याने पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन सुपा बाजुकडे भरधाव वेगात निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी या कारचा पाठलाग केला. कूसेगावच्या हद्दीत कारचा अपघात होऊन पलटी झाली. पोलिसांनी कारची तपासणी केल्यानंतर दोन लोखंडी कोयते आणि लाकडी दांडक्यासह ४ आरोपींना ताब्यात घेतले.
हे सुद्धा वाचा : सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण
पोलिसांचा यात्रा परिसरात चोख बंदोबस्त
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे करीत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी महेश उर्फ मन्या संजय भागवत हा पाटस हद्दीतील तामखडा येथे काही वर्षांपूर्वी दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून, तो सध्या जामीनावर मुक्त होता. सदर दोन आरोपी हे पाटस येथील असून, त्यांच्या गुन्हेगारी टोळ्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ते पाटसच्या यात्रेत येणार असल्याची दबक्या आवाजात चर्चाही होती. यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यवत आणि पाटस पोलिसांचा यात्रा परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना पकडल्याने ग्रामस्थांनी पोलीसांचे कौतुक केले आहे.