
दारू पाजून तरुणाची हत्या
नागपूर : पोळ्यानिमित्त घरी आलेल्या तरुणाला मित्रांनीच कट रचून संपवल्याची घटना तहसील परिसरात घडली. आधी बारमध्ये दारू पाजली. त्यानंतर कसार भवन चौकाजवळ नेले. तेथे शस्त्राने हल्ला करून दगडाने ठेचले. गंभीर जखमी अवस्थेत तरुणाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. मनीष चंद्रशेखर मोहिते (वय ३८, रा. महाल, कोतवाली) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी खुनाचा रुग्णालयात गुन्हा नोंदवून कुणाल झाडे (वय ३०), विनय पौणिकर (वय ३५) आणि निखील चव्हाण (वय २५) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष पाच महिन्यांपासून तुमसर येथे रेतीच्या व्यवसायात होता. पोळ्यानिमित्त ११ सप्टेंबरला तो नागपुरात घरी आला. रात्री मित्र निखिल चव्हाणसोबत तो व्हाईट हाऊस बारमध्ये गेला. काही वेळाने त्याचा भाऊ रोशनही तेथे पोहोचला. त्याचवेळी कुणाल झाडेचा मनीषला फोन आला. कुणाल आणि विनय बारमध्ये आल्यानंतर चौघांनी एकत्र दारू घेतली. काही वेळाने मनीषचा भाऊ घरी परतला. त्यानंतर मनीष व तिघे मित्र दोन दुचाकींवरून कसार भवन चौकाजवळ गेले. तेथील चहाच्या टपरीजवळ पुन्हा दारू प्यायली.
मनीष नशेत असल्याची संधी साधून आरोपींनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्यानंतर दगडाने ठेचले. गंभीर जखमी मनीषला तेथेच सोडून तिघे पसार झाले. मध्यरात्री गस्तीवरील पोलिसांना मनीष जखमी अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. रोशनच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मित्रांना सातत्याने करत होता शिवीगाळ
मनीष गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दारूच्या नशेत मित्रांना शिवीगाळ करण्याच्या त्याच्या सवयीमुळे आरोपी त्याच्यावर नाराज होते. त्यातूनच त्याची हत्या करण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
मित्रांसोबत बाहेर पडला अन् घात झाला
मनीष सणानिमित्त कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी घरी आला होता. दिवसभर पोळ्याचा आनंद घेतल्यानंतर रात्री तो मित्रांसोबत बाहेर पडला. काही तासांतच त्याच मित्रांसोबतचा हा फेरफटका त्याच्या आयुष्यातील अखेरचा ठरला.
Crime News : मोबाईलवरून ओळख; भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात घुसून धक्कादायक कृत्य