Ajit Pawar expressed confidence in victory
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. नोव्हेंबर महिना सुरु झाला असून महिन्याच्या शेवटी राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे. यासाठी महायुती सरकार पुढे सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर महाविकास आघाडी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तर प्रचाराचा जोर देखील वाढला आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे रंगत आली आहे. आता महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच महायुती सरकारमध्ये आपल्याला महत्त्वाचे पद मिळणार असे सूचक विधान अजित पवार यांनी केले आहे.
बारामतीमध्ये अजित पवार यांच्या जोरदार प्रचार सुरु आहे. तासगावमधून अजित पवार यांनी आपल्या प्रचार सभांना सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. बारामतीमधील अनेक गावांना भेट देण्यास व दौऱ्याला अजित पवारांनी सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अजित पवार हे प्रचार करत आहेत. अनेक गावागावांमध्ये दौरे करत मतदारपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत. यावेळेची निवडणूक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्यामुळे जोरदार प्रचार सुरु आहे. यावेळी अजित पवार यांनी सूचक विधान केले आहे.
प्रचारावेळी लोकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, मागचं झालं गेलं आता गंगेला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती तालुक्याचा विकास आणि अधिक फायदा झाला पाहिजे. उद्या काही झालं तरी राज्यात महायुतीचे सरकार येणार… येणार… येणार. ते सरकार आपल्यानंतर आपल्याला तिकडे चांगलं पद मिळणार… मिळणार… मिळणार…, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यावर कार्यकर्त्यापैकी एकाने लगेचच म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होणार, असे म्हटले. त्यावर अजित पवार हसले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोवण्याच्या सूचना केल्या. महिलांना सांगा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना बंद होणार नाही, असे कार्यकर्त्यांना सूचित केले. अजित पवार यांच्या विजयी विश्वास व मुख्यमंत्री पदावरील सूचक विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : भाजपचा ‘राज’ पुत्राला पाठिंबा, शिवसेना शिंदे गटाची काय असणार भूमिका?
पवार कुटुंबामध्ये लढत
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पवार कुटुंबामध्येच लढत होणार आहे. महायुतीकडून अजित पवार तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे पवार कुटुंबामध्येच लढत होणार आहे. युगेंद्र पवार हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले असल्यामुळे बारामतीची लढत रंगणार आहे.