संग्रहित फोटो
सोलापूर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूरमध्ये जबर झटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील पक्षाचे नेते निरंजन भूमकर यांच्यासह पक्षाच्या १५ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींमुळे ऐन दिवाळीत अजित पवारांना धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणूक अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या जागा निवडून आणण्यासाठी व्युहरचना आखली आहे. या अंतर्गत विविध राजकीय पक्षात नाराज नेत्यांचे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
निरंजन भूमकर यांचा शरद पवार गटात प्रवेश
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील स्थानिक नेते निरंजन भूमकर यांनी मनगटावरील घड्याळ सोडत शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या १५ समर्थक नगरसेवकांनीही शरद पवार गटात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे या नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्याची माहिती आहे. निरंजन भूमकर वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. त्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधूमित राष्ट्रवादीला सोडिचिठ्ठी दिल्यामुळे हा अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
बार्शीत दाेन्ही सेनेत हाेणार सामना
बार्शी विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी शिवसेनेने विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने दिलीप सोपल यांना उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने दोन्ही शिवसेनेत सामना होणार असून चुरशीच्या लढतीने राजकारण चांगलेच तापले आहे.
बंडखोर नेत्यांची समजूत
राज्यत विधानसभा निवडणूकीसाठी र्स राजकीय पक्षातील नेते प्रचार करत आहेत. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आपल्या गटातील बंडखोरांची समजूत काढून अधिकृत उमेदवाराच्या विजयाचा मार्ग निर्धोक करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राबत आहेत. राज्यात मविआची सत्ता आली तर तुम्हाला विधानपरिषदेची आमदारकी देऊ किंवा महामंडळ देतो, अशी आश्वासने मविआच्या नेत्यांकडून बंडखोरांना दिली जात असल्याचे समजते.
भेटीगाठी, सभा आणि मेळावे
अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन ते चार दिवस बारामतीमध्ये मुक्कामी असल्याने दिवाळीत आणि दिवाळीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. दोन्ही नेते बारामती तालुक्यात सभाही घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार १, २, व ३ नोव्हेंबर, असे दिवाळीचे तीन दिवस पूर्ण बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा ते प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनीच जाहीर सभेदरम्यान दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील ५ नोव्हेंबर रोजी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, सुपे, मोरगाव व सोमेश्वर येथे सभा घेणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी व्यापारी, वकील व डॉक्टरांशीही ते संवाद साधणार आहेत.