Amit Shah hinted About cm of maharashtra
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी केवळ एक आठवडा बाकी राहिल्यामुळे जोरदार प्रचार केला जात आहे. केंद्रातील दिल्लीचे नेते राज्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ हे प्रचार करत आहेत. तर महाविकास आघाडीसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे तसेच अरविंद केजरीवाल प्रचार करणार आहेत. सध्या अमित शाह हे प्रचार करत असून त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आहे. यामध्ये भाजपचे जास्त आमदार असून देखील मुख्यमंत्रीपद हे शिवसेना शिंदे गटाकडे आहे. पण पुन्हा एकदा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आले तर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 2014 साली झालेल्या निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणुकीनंतर महायुतीकडे जनतेने कौल दिला तर देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत अमित शाह यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
अमित शाह यांनी प्रचार सभेमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर आणि मुख्यमंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस यांना आपल्याला पुन्हा एकदा विजयी करायचे आहे, असे विधान केले आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या नेत्यांनी महायुतीकडे सत्ता आली तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले अमित शाह?
प्रचारसभेमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक विधान केले. “मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचे सरकार आणायचे आणि फडणवीस यांना विजयी करायचे, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे किंवा त्यांनी ठरविले आहे,” असे विधान अमित शाह यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना जोरदार उधाण आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील अकोल्यामध्ये सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीस यांची इच्छा पूर्ण करणार असल्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ विमानतळ उभारण्याची फडणवीस यांची इच्छा महायुती सरकार सत्तेवर आल्यावर मी पूर्ण करणार, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.