Thackeray group's Arvind Sawant's controversial statement about Shaina N. C.
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये वाद विवाद आणि टीका टिप्पणी वाढली आहे. महिला नेत्यांवर टीका करताना नेत्यांची जीभ घसरली आहे. यापूर्वी देखील भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा महिला नेत्याबाबत उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत अपशब्द वापरला आहे. यावरून शायना एन. सी यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबादेवी मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसकडे आला आहे. कॉंग्रेसकडून
अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत 29 ऑक्टोबर रोजी मुंबादेवीमध्ये आले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.” असे अरविंद सावंत म्हणाले. त्यांनी महिला नेत्याला अशा पद्धतीने बोलल्यामुळे आता राजकारण तापले आहे.
महिला नेत्यासाठी इम्पोर्टेड आणि ओरिजनल माल असे शब्द वापरल्याने शायना एन. सी यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी माध्यमांसमोर आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्या म्हणाल्या की, “त्यांच्या पक्षाची विचारधारा यामुळे स्पष्ट होतेय. ते एका महिलेला माल म्हणतात. मी त्यांना विचारू इच्छिते की मुंबादेवीची प्रत्येक महिला माल आहे का? २०१९, २०१४ ला ते मोदींचं नाव लावून जिंकून आले आहेत. मी त्यांचा लाडक्या बहिणीप्रमाणे प्रचार केला. आता पाहा त्यांची मनस्थिती, विचार पाहा. ते जेव्हा म्हणतात ही महिला माल आहे. मालचा अर्थ आयटम. या शब्दाचा वापर तुम्ही केला माल, हेच मतदार तुम्हाला बेहाल करणार. सक्षम महिलेचा सन्मान करू शकत नाही, असा घणाघात शायना एन. सी यांनी केला.
महिला हूँ, माल नहीं #MahilaHoonMaalNahi
— Shaina Chudasama Munot (@ShainaNC) November 1, 2024
हे देखील वाचा : अमित ठाकरे लागले प्रचाराला! बायकोसह दिल्या मतदारांच्या घरी भेटी
पुढे त्या म्हणाल्या की, आधी ते मोदींच्या नावावर जिंकून आले आणि आता 2024 च्या निवडणुकीत ते मला माल म्हणतात. त्यांची मनस्थिती यामुळे स्पष्ट होते. त्यांच्या पक्षाचे नेतृत्त्व का गप्प आहेत? उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी आता बोललं पाहिजे. मी याबाबत कायदेशीर पाऊल उचलेन किंवा नाही. पण एका महिलेला माल म्हणणाऱ्यांचे जनता नक्की हाल करेल.” अशा कडक शब्दांत वापरल्याने शायना एन. सी यांनी अरविंद शिंदे व महाविकास आघाडीला खडेबोल सुनावले आहेत.