
धंगेकरांनी कालच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या आक्रमकतेवर बोलताना म्हटले की, काल आमच्या कार्यकर्त्यांना भावनांचा उद्रेक झाला. त्यांच्या भावनांचा विचार करून पक्षाने त्यांना सन्मान दिला पाहिजे, फक्त आमच्याच पक्षाचे नाही तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे, या हेतूने काल आमचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यानंतर उदय सामंत यांना भेटलो. पुणे शहरामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल, तर मग निवडणुका कोणासाठी लढवायच्या, हा महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर भाजपाने जो प्रस्ताव आमच्या शिवसेनेला दिला आहे, तो आम्हाला मान्य नाही, त्यांनी ज्या जागा आम्हाला ऑफर केल्या आहेत, त्या जागांवर कधी भाजपाही निवडून आले नाही किंवा शिवसेनाही निवडून आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (ajit pawar) पक्षाने शिवसेनेशी बोलण्याची तयारी दर्शवली आहे, शेवटी कार्यकत्यांच्या भावना ओळखून पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, पण कार्यकत्यांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ही खऱ्या अर्थाने कार्यकत्यांची निवडणूक आहे, असेही धंगेकर यांनी म्हटले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची चर्चा शुक्रवारी फिस्कटली. कारण अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्यात आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय.
धंगेकर म्हणाले, “आमच्या पक्षाच्या जागा आम्ही ठरवणार, आमच्या पक्षाचे उमेदवार आम्हीच ठरवणार, तर त्याउलट आमचे उमेदवार पण तेच ठरवणार, जागादेखील तेच ठरवणार, असे असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र आहेत, यामध्ये नेत्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आम्ही काल एकनाथ शिंदेंना सांगितले आहे, अशा प्रकारची युती करणे घातक आहे, शेवटी जर तुमच्या जागा निवडून येणार नसतील तर, तर तुम्हाला युतीचा फायदा काय आहे, त्यापेक्षा आपण आपला निर्णय कार्यकर्त्यांच्या बाजूने घेतला पाहिजे, असेही धंगेकर म्हणाले.