Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde leave for Delhi to decide Maharashtra Chief Minister
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे राजकारण रंगले आहे. निवडणुकीचा अविश्वसनीय असा निकाल हाती आला आहे. महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागल्यानंतर देखील लवकर सत्तास्थापनेबाबत दावा केला नाही. मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. 134 जागांवर विजय मिळवून भाजपने सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा असा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला असून राज्यातील महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा न भुतो न भविष्यती असा निकाल हाती आला. यामध्ये महायुतीचा विराट विजय पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. तर विरोधी पक्षनेतापदावर दावा करण्याएवढे देखील संख्याबळ विरोधकांना मिळवता आलेला नाही. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र महायुतीने पूर्ण बहुमत मिळवून देखील लवकर सत्तास्थापनेचा दावा न केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता मात्र लवकरच राज्यामध्ये सरकार स्थापन केले जाणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार व एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीमध्ये घेतला जाणार आहे. यापूर्वी निवडणुकीच्या जागावाटप व फॉर्मुला ठरवण्यावेळी नेत्यांनी दिल्लीवारी केली आहे. आता निकालानंतर देखील महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीकडे रवाना झाले आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी नेते भेट घेणार आहेत. त्यामुळे आता अमित शाह यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्राच्या सरकारस्थापन आणि मंत्रीपदाचे वाटप याची चर्चा होणार आहे.
महायुतीच्या पूर्वीच्या सरकारप्रमाणे यावेळी देखील एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला होता. तर एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला. यामुळे आता मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आग्रही आहे. यासाठी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पाठिंबा आहे. मात्र आता होणार दिल्लीतील बैठकीमध्ये भाजप पक्षश्रेष्ठी नक्की काय निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकनाथ शिंदेंनी सोडला दावा
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, राज्यात मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे. मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी खूप समाधानी आहे. म्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रसाठी काम करेन. मी काहीही ताणून ठेवलेले नाही. मी काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. सत्तास्थापनेसाठी आमच्याकडून कोणतीही अडचण होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपश्रेष्ठी निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असेल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला.