फोटो सौजन्य- iStock
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून महाराष्ट्रामध्ये दि. २० नोव्हेंबर रोजी एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता तुमचे नाव हे मतदार यादीमध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे. ज्यांनी अद्यापही आपले नाव मतदारयादीत समाविष्ट केले नाही आहे त्यांना 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आवाहन केले आहे की, आपले नाव आवर्जून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. तसेच ज्यांनी अजून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही त्यांनी तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येईल नोंदणी
ज्यांनी अजूनही आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे. शासनाचा निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र असलेल्या मतदारांनी अजूनही नोंदणी केली नाही अथवा काही कारणाने राहिली असल्यास अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19.10.2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येणार आहे. तरी या संधीचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करावे आणि लोकशाहीतील आपला सर्वात महत्वाचा असा मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा.
महाराष्ट्रातील निवडणुकां एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. उमेदवारांना 23 ऑक्टोबर 2024 ते 29 ऑक्टोबर 2024 या काळात अर्ज भरता येणार आहे. 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल. तर उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 4 नोव्हेंबर 2024 असणार आहे. . तसेच, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगा मार्फत काही नागरिकांना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.