सौजन्य - सोशल मिडीया
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले उमेदवार राजू लाटकर यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी सोमवारी अनपेक्षितरीत्या माघार घेतली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षासमोर या मतदारसंघात उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता.
हेही वाचा-Jharkhand Election 2024: अशा पद्धतीने होणार झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका; वाचा सविस्तर
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार राजेश क्षीरसागर विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत राजू लाटकर यांच्यात थेट लढत होईल. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी लाटकर यांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेनेचे (ठाकरे) नेते विजय देवणे यांनी अनुमोदन दिले. आमदार सतेज पाटील यांनी प्रास्ताविक केले. काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्याबद्दल राजू लाटकर यांनी आभार मानले.
काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही, असे स्पष्टीकरण खासदार शाहू महाराजांनी दिले आहे.
पक्षाची गरज म्हणून उमेदवारी स्वीकारली
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे, असे आमचे ठरले होते.
कॉंग्रेसचे नेते चांगलेच संतापले
दरम्यान, मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कॉंग्रेसचे नेते चांगलेच संतापले होते. माध्यमांसोरही त्यांना राग व्यक्त केला होता. त्यावर अजित पवारांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसला दिला. कोल्हापूरमध्ये महायुतीची सभा पार पडली. यासभेत ते बोलत होते.
हेदेखील वाचा : छत्रपतींच्या गादीचा अपमान खपवून घेणार नाही; काँग्रेसच्या कालच्या राड्यावरून अजित पवारांचा हल्लाबोल