Shiv Sena Eknath Shinde campaign ends press conference
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला असून अवघा काही काळ हा प्रचारासाठी बाकी राहिला आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. तसेच राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ही यंदाची विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना राजकारणाला उधाण आले आहे. अखेरच्या वेळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
प्रचाराच्या सांगतावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, “संपूर्ण राज्यामध्ये शक्य तेवढ्या जास्तीत जास्त सभा घेतल्या. सगळ्या सभांमध्ये एकच उत्साह व जल्लोष होता. सरकारने सव्वा दोन वर्षामध्ये केलेली सर्व कामं आणि महाविकास आघाडीने केलेला विरोध केला ते आम्ही लोकांसमोर मांडली. जलयुक्त शिवार योजना, अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो 3, कारशेड, समृद्धी महामार्ग जलसिंचनाचे प्रकल्प असे अनेक प्रकल्पामध्ये स्पीडब्रेकर लावण्याचे काम महाविकास आघाडीने केले,” असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान
पुढे ते म्हणाले की, “माझं महाविकास आघाडीला खुलं आव्हान होतं. तुम्ही अडीच वर्षांमध्ये काय केलं ते सांगा आम्ही सव्वा दोन वर्षांमध्ये काय केलं ते सांगतो. होऊन जाऊ द्या समोरासमोर. राज्याच्या हिताचे जे त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरु केले. मी होतो तेव्हा यांच्या सरकारने फक्त 4 सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली. आम्ही महायुती सरकारने 124 प्रकल्पांना मान्यता दिली. आम्ही जे दोन वर्षामध्ये काम केलं याचं आम्हाला समाधान आहे. हे लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत आहे. आमच्या कामावर जनता खुष आहे. ते आम्हाला मतदानरुपी आशिर्वाद देणार आहेत,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “महाराष्ट्र लुटायला यांना महाराष्ट्राची तिजोरी कमी पडत होती. हे खरे दरोडेखोर आहेत. मातोश्रीवरुन तिजोरी मागून घ्यायला पाहिजे होती. त्यात खूप काही निघालं असतं. हा त्यांचा बालीशपणा आहे. अदानी यांना आम्ही जमीन दिलेली नाही. आम्ही जमीन डीआरपीला दिलेली आहे. ते दोन लाख लोकांना घरं देण्याचं काम होत आहे. उबाठा सरकारने जे पात्र आहेत त्यांना घरं देण्यात येतील असे सांगितले आहे. 60 हजार लोकांना घरं देण्याचा निर्णय उबाठाचा तर 2 लाख लोकांना घरं देण्याचा निर्णय आमचा आहे,” असे मत एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या सभेमध्ये मांडले आहे.
‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या घोषणेवर देखील एकनाथ शिंदे यांनी मत व्यक्त केले. “या घोषणेचा अर्थ वाकडा का घेत आहेत. सरळ घ्या ना. जर नरेंद्र मोदी म्हणत आहेत की एक आहे तर सेफ आहे. तर काय एक होऊ नये का? एक होऊन मतदान करु नये का? या देशाला आणि राज्याला सुरक्षिता हवी असेल तर एकजूट असली पाहिजे. विदेशामध्ये जाऊन त्यांचे नेते देशाची बदनामी करत आहेत. आणि पाकिस्तानचे गोडवे गात आहेत. काश्मीरमधील 370 कलम हटवा म्हणून बोलत आहेत. म्हणून एकजूट पाहिजेत,” असे मत एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या प्रचारसभेमध्ये व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकनाथ शिंदे म्हणाले की, “मागच्या 15 वर्षांमध्ये मुंबईचं वाटोळ कोणी केलं. खड्ड्यामधून प्रवास करायला लावला. त्यांना काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळ करायला लागतं. साडे तीन हजार लाख रुपये खर्च केले. हे कोणाचे पैसे खर्च केले. आम्ही खड्डेमुक्त मुंबई करण्याचा आमचा मानस आहे. कोव्हिडमध्ये पैसे खाल्ले यांनी…खोटं कोव्हिड सेंटर दाखवून पैसे खाल्ले. खिचडीमध्ये घोटाळा केला. हे पाप आहे. याचा जवाब यांना विधानसभा निवडणुकीमध्ये द्यावा लागेल,” असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचाराच्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.