Sunil Shelke is campaigning vigorously in Vadgaon Maval
वडगाव मावळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळमध्ये प्रचाराचा धुराळा उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करणे, धमक्या देणे, महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करून त्यांना वारंवार अपमानित करणे, यातून विरोधकांची मानसिकता दिसून येते. मात्र या सर्वांची किंमत विरोधकांना चुकवावीच लागेल, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा दीपाली गराडे यांनी दिला. दमदाटी आणि दहशतीने नाही तर प्रेमाने मतदारांना जिंका, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.
मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी आज (दि.16) पवन मावळातील परंदवडी, धामणे, बेबेड ओहोळ, शिवणे या पट्ट्यातील गावांचा जनसंवाद दौरा करत मतदारांशी संपर्क साधला. त्यावेळी दीपाली गराडे बोलत होत्या. आमदार सुनील शेळके यांनी गावात रस्ते, पाण्याची टाकी आदी विविध विकासकामे केली. त्यासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. “गावातील सर्व माता- भगिनी, युवक बांधव व ज्येष्ठ नागरिक सगळेच तुमच्या सोबत आहेत,” अशी ग्वाही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.
परंदवडी ते धामणे पायी प्रचारफेरी
सुनील शेळके यांनी परंदवाडी ते धामणे पायी प्रचार फेरी काढली. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. धामणे येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा दीपाली गराडे यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी केली. धामणे गावात रस्ते, पाणी टाकी, स्मशानभूमी सुशोभीकरण, क्रीडांगण, मंदिराचे सुशोभीकरण आदी कामे केल्याचे गराडे यांनी सांगितले.
दीपाली गराडे म्हणाल्या, “सुनील शेळके लाडक्या बहिणींच्या मनात काय चाललंय हे नेमकं ओळखतात, हे काल पुन्हा एकदा सिद्ध झाले. राज्यात महिलांचे नेतृत्व करणाऱ्या रुपाली चाकणकर यांना भेटायची तीव्र इच्छा आमच्या मनात होती. ती इच्छा देखील त्यांनी पूर्ण केली. आमचे सुनील शेळके आमच्यासाठी सर्वस्व आहेत, त्यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व भगिनी जीवाची बाजी लावू, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बेबेड ओहोळचा ३० वर्षांचा प्रश्न आमदारांनी सोडवला
बेबेड ओहोळ गावातील रस्त्याचा ३० वर्षे रखडलेला प्रश्न सोडविल्याने आमदार शेळके यांचे जोरात स्वागत करण्यात आले. स्मशानभूमीचे सुशोभीकरण, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पवना नदी घाट, वाड्या-वस्त्यांवर भुयारी गटारे अशी अनेक कामे आमदार शेळके यांनी केली. त्यासाठी १२ कोटी रुपयांहून अधिक शेळके यांनी गावासाठी उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. गावात यापूर्वी एवढी विकासकामे कधीच झाली नव्हती, त्यामुळे आमदार शेळके यांनाच आम्ही पुन्हा निवडून देऊ, असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी दिला.
शरद पवार यांच्या बॅगेची म्हसळ्यात निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी !
शिवणे येथे घोड्यावरून मिरवणूक
घोड्यावरून मिरवणूक काढत शिवणे ग्रामस्थांनी आमदार शेळके यांचे जोरदार स्वागत केले.
रस्ते, पाणी, मंदिर सुशोभीकरण, रस्त्याचे काँक्रिटीकरण, दिवाबत्तीचा सोय अशी कितीतरी विकासकामे आमदारांनी केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे जाहीर आभार मानले. “बाजारात चर्चा आहे की, सुनील शिवणे गावात ‘मायनस’मध्ये आहेत. मी तर सांगतो की, सुनील शेळके शिवणेमध्ये नुसते ‘प्लस’च नाही तर ‘लीड प्लस प्रेम’ आहे“, अशी टिप्पणी अजिंक्य टिळे यांनी केली.