म्हसळा (वार्ताहर): राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराला वेग येत आहे. राज्यातील प्रमुख नेते विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची म्हसळा येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.
शरद पवार यांनी श्रीवर्धन मतदार संघाचे महाविकास उमेदवार अनिल नवगणे यांचा प्रचारार्थ घेतलेल्या सभेसाठी हजेरी लावली होती.शरद पवार हेलिपॅडवर दाखल होताच त्यांच्यासोबत असलेल्या बॅगा आणि साहित्याची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.यावेळी कपडे, पाणी बॉटल, न्युज पेपर आणी महत्वाचे कागदपत्रे बॅगेत होती ही माहिती या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणीची झाली चर्चा
उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा बॅग तपासण्याचा व्हिडिओ काढला होता . त्यानंतर ठाकरेंचीच बॅग का चेक केली जात आहे. असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांच्या बॅग तपासण्याचे व्हिडिओ जारी केले होते. आता शरद पवार यांची बॅगही तपासली गेली आहे.
श्रीवर्धन मतदारसंघ
श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या, मंत्री आदिती तटकरे या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात या मतदारसंघात शरद पवार गटाकडून अनिल नवगणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. हा मतदारसंघ सुनील तटकरेंचा बालेकिल्ला आहे. मागील तीन निवडणुकीत येथे तटकरे घराण्यातील व्यक्तीच निवडून आला आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीमध्येही या मतदारसंघातून सुनील तटकरे यांना मोठे मताधिक्क्य मिळाले होते. त्यामुळे आदिती तटकरेंचे पारडे जड असल्याचे दिसत असले तरीही विधानसभेची समीकरणे वेगळी असू शकतात.
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
सध्या राज्यभर शरद पवार दौरे करत आहेत. त्यांचे विशेष लक्ष्य हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुख्य नेत्यांच्या मतदारसंघाकडे आहे. त्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघाचाही समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट कोकणामध्ये या मतदारसंघात आणि रत्नागिरीमध्ये चिपळूण मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. तसेच महत्वाचे म्हणजे हे पक्षाच्या कोकणातील अस्तित्वासाठीही हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी तितकेच महत्वाचे आहेत. आता शरद पवार यांच्या श्रीवर्धनमधील येण्याने मतदारसंघावर परिणाम होतो की सुनील तटकरे आपला बालेकिल्ला कायम ठेवतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.