
विदर्भात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार; जागावाटपावर चर्चांमधून तोडगा नाहीच
नागपूर : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच मुंबई महापालिकेत जे घडले, ते नागपूरसह विदर्भातील चारही महापालिका निवडणुकीसाठी वंचितबाबत घडू शकले नाही. वंचित यापूर्वीच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही स्वबळावर रिंगणात उतरणार आहे. चंद्रपुरात ठाकरे गटासोबत गेल्यानंतर नागपूर, अमरावती अकोल्यात व काँग्रेससोबत चर्चा झाली. मात्र, जागावाटपात समाधान न झाल्याने स्वबळाची घोषणा केली गेली.
नागपुरातही २४ प्रभागांत पक्षाने उमेदवार उतरविले असून, त्यांना एबी फॉर्मच्या वितरणासही सुरुवात केली. पक्षाचे निवडणूक निरीक्षक प्रा. अनिकेत मून यांनी आज पत्रपरिषदेत ही माहिती दिली. नागपुरातील काँग्रेसचे नेतृत्व सरंजामी मानसिकतेचे असून, वंचितला अपमानास्पद वागणूक दिली गेली. बहुजनांना मतमेटी समजणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात वंचित रिंगणात आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे ३६ जागांचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, काँग्रेसच्या शहर नेतृत्वाने तुमचे अस्तित्व कुठाय, असे म्हणून हेटाळणी केली. केवळ ४ जागा सोडण्याची तयारी दर्शविली, असेही मून म्हणाले.
हेदेखील वाचा : BMC Election : भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीतही वाडीमध्ये आघाडीबाबत बोलणी सुरू होती. तेथेही तसाच पावित्रा काँग्रेसने घेतला. त्याचे परिणाम आता सर्वांसमोर आहेत. मुंबई महापालिकेत आघाडी झाल्याच्या पार्श्वभूमीवर वंचितने येथेही सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व ऐकण्याच्या मानसिकेतच नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.
आम्ही स्वाभिमानाची लढाई लढणार
आम्ही स्वाभिमानाची लढाई लढणार आहोत. पाटीलकी विरोधात मैदानात उतरून मतपेटीतून ताकद दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ बहुजनांच्या मतांवरच काँग्रेसचा डोळा असल्याचा आरोपही मून यांनी केला. पत्रपरिषदेला वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सहारे, शहराध्यक्ष मंगेश वानखेडे उपस्थित होते.
मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेनेत (शिंदे गट) जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा १३७ जागा तर, एकनाथ शिंदेंची शिवेसना ९० जागांवर निवडणूक लढणार आहे.
हेदेखील वाचा : Pune Politics : पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात