
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
विपुल अमृतलाल शाह यांच्या निर्मितीतील आणि अभिनेता Manoj Bajpayee मुख्य भूमिकेत असलेला ‘गव्हर्नर’ हा चित्रपट सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एक ठरला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळवला असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
हा ट्रेलर प्रेक्षकांना 1990 च्या दशकातील भारतात घेऊन जातो, जेव्हा देश गंभीर आर्थिक संकटातून जात होता. त्या कठीण काळात देशाची आर्थिक दिशा ठरवणारे महत्त्वाचे निर्णय आणि घडामोडी या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.
या चित्रपटात मनोज बाजपेयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या गव्हर्नरच्या भूमिकेत दिसत आहेत. ही भूमिका अतिशय आव्हानात्मक असून त्यांनी या पात्रासाठी विशेष तयारी केली आहे. आर्थिक घडामोडी, मूलभूत अर्थशास्त्र आणि त्या काळातील परिस्थिती समजून घेण्यासाठी त्यांनी सखोल अभ्यास केल्याचेही समोर आले आहे.ट्रेलरमध्ये मनोज बाजपेयींचा गंभीर, प्रभावी आणि वेगळा अवतार दिसत असून त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा देशाच्या इतिहासातील महत्त्वाच्या टप्प्यावर प्रकाश टाकते.
‘गव्हर्नर’ हा चित्रपट सध्या ट्रेलरमुळेच चर्चेच्या केंद्रस्थानी असून, आगामी काळात तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भूमिकेसाठी केला सखोल अभ्यास
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये अभिनेता Manoj Bajpayee यांनी त्यांच्या आगामी ‘गव्हर्नर’ चित्रपटातील भूमिकेसाठी केलेल्या तयारीबाबत मनमोकळा खुलासा केला आहे. या चित्रपटात ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या गव्हर्नरच्या भूमिकेत दिसणार असून, ही भूमिका अधिक वास्तववादी आणि विश्वासार्ह करण्यासाठी त्यांनी अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा सखोल अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज बाजपेयी म्हणाले, “मी या चित्रपटात RBI गव्हर्नरची भूमिका साकारली आहे. त्यामुळे मला अर्थशास्त्रातील काही मूलभूत संज्ञा समजून घ्याव्या लागल्या. अर्थशास्त्र हा माझा मजबूत विषय नव्हता, त्यामुळे प्रत्येक सीन आणि संवादासाठी मला त्या संज्ञांचा अर्थ ऑनलाइन शोधावा लागत होता. एक अभिनेता म्हणून मी जे काही पडद्यावर बोलतो ते खरे वाटले पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “जर मला स्वतःलाच ‘1.5 बिलियनचा डेफिसिट बॅलन्स’ म्हणजे काय हे समजले नाही, तर मी ते प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचवू शकलो असतो?”सत्य घटनांपासून प्रेरित ‘गव्हर्नर’ हा चित्रपट भारताच्या 1990 च्या दशकातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. त्या काळातील महत्त्वाचे आर्थिक निर्णय, राजकीय हालचाली आणि देशातील प्रमुख संस्थांमधील संघर्ष यांचे सखोल आणि नाट्यमय चित्रण या कथेत पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता मनोज बाजपेयी एका अत्यंत निर्णायक भूमिकेत दिसत असून, त्यांनी साकारलेला RBI गव्हर्नर देशाच्या आर्थिक भवितव्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये केंद्रस्थानी आहे.‘सनशाईन पिक्चर्स’च्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून, निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांची आहे. सहनिर्माते आशिन ए. शाह आहेत. पटकथा सुवेंदू भट्टाचार्य, सौरभ भारत, रवी असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी लिहिली असून, गीतलेखन जावेद अख्तर यांचे तर संगीत अमित त्रिवेदी यांचे आहे.‘गव्हर्नर’ हा चित्रपट 12 जून 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.