(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Anil Kapoor on Shatrughan Sinha: बॉलिवूडमधील कलाकारांच्या मैत्रीचे अनेक किस्से नेहमीच चर्चेत असतात. काही कलाकारांची मैत्री वर्षानुवर्षे टिकून राहते आणि त्यांच्यातील जिव्हाळा अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावरही पाहायला मिळतो. अभिनेता अनिल कपूर आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मैत्रीही अशीच जुनी आहे. नुकतेच अनिल कपूर यांनी स्टार प्लसवरील ‘इंडिया के टॉप 1% – द अनिल कपूर शो’मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल भरभरून कौतुक केले. इतकेच नव्हे, तर ते आपले शेजारी आहेत याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनिल कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांची ओळख अनेक दशकांपासूनची आहे. १९८० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘युद्ध’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. चित्रपटातील सहकलाकार असण्यासोबतच खऱ्या आयुष्यातही दोघे शेजारी आहेत. शोमधील ‘ग्रेट इंडियन बुद्धी लीग’ या विशेष भागात बिहारमधील स्पर्धक लालमणी श्रीवास्तव यांनी स्वतःला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असल्याचे सांगितले. बिहारमधील लोक नेहमी आनंदी असतात, असेही ते म्हणाले.
यावेळी अनिल कपूर यांनी एक प्रसिद्ध म्हण सांगितली, “जो न कटे आरी से, वो कटे बिहारी से.” त्यानंतर त्यांनी बिहारमधील प्रतिभावान व्यक्तींचा उल्लेख करत शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव घेतले.
शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले, “शत्रुघ्न सिन्हा साहेब माझे शेजारी आहेत. ते बिहारचे आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो. ते खूप चांगले माणूस आहेत आणि माझे त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. खरं तर शत्रुघ्न साहेब हे मित्रांचे मित्र आहेत आणि ते माझे शेजारी आहेत याचा मला अभिमान आहे.”
अनिल कपूर यांच्या या वक्तव्यामुळे दोघांमधील मैत्री आणि जिव्हाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, ‘इंडिया के टॉप 1% – द अनिल कपूर शो’ हा कार्यक्रम दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे.






